28 मार्च 1874 रोजी शापूरजींचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचं नाव दोराबजी, तर आईचं नाव मेहजेरबाई असं होतं. टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी नुसरवानजी टाटा यांची सर्वांत धाकटी कन्या म्हणजे मेहजेरबाई. शापूरजी खूप लहान असतानाच त्यांचे आई-वडील विभक्त झाले. वयाच्या 14व्या वर्षी शापूरजी आपल्या आईसह मुंबईत टाटा परिवाराच्या घरात म्हणजे एक्सप्लेनेड हाउसमध्ये राहायला आले. तिथे त्यांचे मामा वगैरेही राहत होते. त्यांचं पालनपोषणही मामांनीच केलं. त्यांच्या मामाचं नावही जमशेदजी असंच होतं.
advertisement
प्लेगवरील लस विकसित...
शापूरजी सकलतवाला यांचं प्राथमिक शिक्षण मुंबईत सेंट झेवियर्समध्ये झालं. 1890च्या दशकात मुंबईत ब्यूबॉनिक प्लेगचा फैलाव झाला होता, तेव्हा सकलतवाला यांनी खूप जवळून ते अनुभवलं. गरीब, कामगार प्लेगने मरताना त्यांनी पाहिले आणि त्यांचं हृदय कळवळलं. तेव्हा ते कॉलेजमध्ये शिकत होते. त्यांनी गरिबांसाठी काही तरी करण्याचा निर्णय घेतला. रशियन शास्त्रज्ञ वाल्देमर हाफकिन यांच्यासह मिळून त्यांनी प्लेगवरची लस विकसित केली. त्यांनी घरोघरी जाऊन लशीचं वाटप केलं.
उपचारासाठी लंडन गाठलं....
1905 साली शापूरजी सकलतवाला यांची तब्येत बिघडली. त्यांना मलेरिया झाला आणि तो कमी व्हायचं नाव घेईना. त्यानंतर ते उपचारांसाठी लंडनला गेले. 1907 साली तिथेच त्यांनी सॅली मार्श यांच्याशी विवाह केला. मार्श वेट्रेस होत्या आणि सर्वसामान्य कुटुंबातल्या होत्या. त्यामुळे विवाहानंतर शापूरजींना ब्रिटनमधल्या कामगारवर्गाबद्दल जाणून घेता आलं. त्यानंतर त्यांनी ब्रिटनच्या राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला.
राजकारणात उतरले, कम्युनिस्ट पक्षात सहभागी...
शापूरजी सकलतवाला यांनी 1909 साली अधिकृतरीत्या लेबर पार्टीमध्ये प्रवेश केला; पण तिथे ते रमले नाहीत. 12 वर्षांनंतर ते कम्युनिस्ट पक्षात सहभागी झाले. 1920पर्यंत ते ब्रिटनमधल्या प्रसिद्ध नेत्यांमध्ये गणले जाऊ लागले. 1922 साली ते पहिल्यांदा खासदार झाले आणि सात वर्षं खासदार राहिले.
भारतीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न...
शापूरजी सकलतवाला ब्रिटनमध्ये राहून भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करत राहिले. तेव्हा स्वातंत्र्य चळवळ टिपेला पोहोचली होती. खासदार म्हणून ते भारतात सातत्याने येत होते आणि कामगार वर्गाला स्वातंत्र्यचळवळीशी जोडण्याचं काम त्यांनी केलं. भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये एकजूट निर्माण करण्यासाठीही ते त्या काळात अनेक भागांमध्ये मोहीम चालवत होते. महात्मा गांधींशी शापूरजींचे अनेक मुद्द्यांवर मतभेद होते. गांधी स्वतःला महात्मा म्हणण्याची परवानगी कशी देऊ शकतात, हा त्यातला एक मुद्दा होता. महात्मा गांधींच्या अहिंसेच्या सिद्धांताबद्दलही शापूरजी यांचे विचार वेगळे होते.
ब्रिटन सरकारचे निर्बंध
1927 पर्यंत ब्रिटिश सरकार शापूरजींवर वैतागलं. त्यांच्या भारतात येण्यावर आणि इथल्या नागरिकांना भेटण्यावर ब्रिटनने बंदी घातली. ब्रिटनमधल्या 1929च्या सार्वत्रिक निवडणुकीत ते उतरले होते; मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यांची खासदारकी गेली. तरीही ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी आवज उठवत राहिले. 16 जानेवारी 1936 रोजी वयाच्या 61व्या वर्षी सकलतवाला यांचं निधन झालं. जमशेदजी टाटा यांना लंडनमध्ये जिथे दफन करण्यात आलं होतं, त्याच दफनभूमीत शापूरजी सकलतवाला यांचं दफन करण्यात आलं