एकीकडे शस्त्रसंधीच्या घोषणेवरून विरोधी पक्ष सरकारला टार्गेट करत असतानाच रविवारी ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्नावर आणखी एक वक्तव्य केलं. भारत-पाकिस्तान यांच्यातला काश्मीर प्रश्न सोडवायला आपण मदत करू, असं ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर भारताने कठोर भूमिका घेतली आहे. काश्मीरवर आमची भूमिका स्पष्ट आहे, आम्हाला कुणाच्याही मध्यस्तीची गरज नाही, असं भारताने स्पष्ट केलं आहे.
advertisement
'काश्मीरबद्दल आमची भूमिका स्पष्ट आहे. आता फक्त एकच मुद्दा शिल्लक आहे, तो म्हणजे पाकिस्तान व्याप्त काश्मीर भारतात आणणं. याशिवाय आणखी कोणतीही चर्चा होणार नाही. जर दहशतवाद्यांना सोपवून चर्चा करायची असेल, तर आम्ही चर्चा करायला तयार आहोत. बाकी कोणत्याही विषयावर आमची काहीही भूमिका नाही. याबाबत कुणीही मध्यस्ती करू नये, आम्हाला कुणाच्याही मध्यस्तीची गरज नाही', असं भारताने स्पष्टपणे सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
'भारत आणि पाकिस्तानच्या मजबूत आणि शक्तिशाली नेतृत्वाचा मला खूप अभिमान आहे, कारण त्यांनी आक्रमकता थांबवली ज्यामुळे असंख्य लोकांचे मृत्यू आणि विनाश झाला नाही. दोन्ही देशांच्या नेतृत्वाने शहाणपण आणि धैर्य दाखवलं, अन्यथा लाखो निष्पाप लोकांचा मृत्यू झाला असता. तुम्ही केलेलं हे कृत्य धाडसी आहे', असं ट्रम्प म्हणाले.
'मला अभिमान आहे की या ऐतिहासिक आणि शौर्यपूर्ण निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी अमेरिका तुमची मदत करू शकली. चर्चा झाली नसली तरी मी या दोन्ही महान राष्ट्रांसोबतचा व्यापार मोठ्या प्रमाणावर वाढवणार आहे. याव्यतिरिक्त हजारो वर्षांनंतर काश्मीरबाबत तोडगा निघू शकतो का? हे पाहण्यासाठी मी तुमच्या दोघांसोबत काम करेन. भारत आणि पाकिस्तानच्या नेतृत्वाला चांगल्या कामासाठी देव आशिर्वाद देवो', असं वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं.