नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी ६ वाजून १० मिनिटांच्या सुमारास पुंछमधील दिगवार सेक्टरमध्ये सीमेवर तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या जवानांना एक संशयास्पद ड्रोन घिरट्या घालताना दिसले. हे ड्रोन पाकिस्तानच्या बाजूने भारतीय हद्दीत शिरले होते. धोका ओळखून जवानांनी या ड्रोनला पाडण्यासाठी तत्काळ डझनभर फैरी झाडल्या. जवानांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे ड्रोन काही वेळ घिरट्या घालून पुन्हा पाकव्याप्त काश्मीरच्या (PoK) दिशेने पसार झाले.
advertisement
तीन दिवसांत दुसरी घटना
विशेष म्हणजे, गेल्या तीन दिवसांत पाकिस्तानी ड्रोनने घुसखोरी करण्याचा हा दुसरा प्रयत्न आहे. यापूर्वी २७ फेब्रुवारी रोजी देखील याच भागात एका पाकिस्तानी ड्रोनने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता, ज्यावर भारतीय सैन्याने गोळीबार केला होता. वारंवार होणाऱ्या या हालचालींमुळे भारतीय लष्कराने या भागात कडक पाळत ठेवली आहे.
मोठी शोधमोहीम सुरू
ड्रोन परत गेले असले तरी, त्यातून शस्त्रास्त्रे किंवा अंमली पदार्थांची (नार्कोटिक्स) तस्करी झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही शक्यता लक्षात घेऊन भारतीय लष्कराने दिगवार आणि आजूबाजूच्या परिसरात मोठी शोधमोहीम (Search Operation) सुरू केली आहे. सीमेवरील प्रत्येक हालचालीवर जवान नजर ठेवून असून सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.
