सामाजिक कार्यांच्या माध्यमातून आपल्या नेत्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी भाजपने 'सेवा पखवाडा' अर्थात सेवा पंधरवडा हा उपक्रम सुरू केला आहे. हा उपक्रम गांधी जयंतीपर्यंत (2 ऑक्टोबर) सुरू राहील. पंधरा दिवस चालणाऱ्या या उपक्रमावर देखरेख ठेवण्यासाठी भाजपने राष्ट्रीय सरचिटणीस सुनील बन्सल यांच्या अध्यक्षतेखाली नऊ सदस्यांची समिती स्थापन केली आहे.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आज नवी दिल्लीत रक्तदान शिबिराचं उद्घाटन करून 'सेवा पखवाडा' उपक्रमाची सुरुवात करतील. याशिवाय, पंतप्रधान मोदींचं जीवन आणि योगदानावर प्रकाश टाकणाऱ्या एका प्रदर्शनाचंदेखील उद्घाटन केलं जाईल.
advertisement
सेवा पंधरवड्याअंतर्गत भाजपने रक्तदान शिबिरं, वृक्षारोपण मोहीम, शाळामध्ये स्वच्छता मोहीम, वृद्ध महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिरं, लहान मुलांसाठी कार्यक्रम यांसारखे कार्यक्रम आयोजित करण्याचं ठरवलं आहे. याशिवाय, नुकत्याच पार पडलेल्या पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंचा सत्कार सोहळादेखील आयोजित केला आहे. 2014 पासून दर वर्षी पीएम मोदींच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम आयोजित केला जातो.
17 सप्टेंबर रोजीचं पंतप्रधान मोदींचं वेळापत्रक
पंतप्रधान आपल्या वाढदिवशीही सुट्टी न घेता काम करणार आहेत. सरकारचा महिला-केंद्रित उपक्रम असलेल्या सुभद्रा योजनेचा शुभारंभ करण्यासाठी ते ओडिशाला भेट देतील. या दौऱ्यात रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा शुभारंभही ते करणार आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या घवघवीत यशानंतर पंतप्रधान मोदी 12 जून रोजी मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी ओडिशाला गेले होते. त्यानंतर ही त्यांची पहिलीच ओडिशा भेट असेल.
ते भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानाने अहमदाबादहून रवाना होतील आणि सकाळी 11 वाजता भुवनेश्वर विमानतळावर पोहोचतील. 11 वाजून पाच मिनिटांनी ते गडाकाना बस्ती या झोपडपट्टीकडे रवाना होतील. सकाळी 11 वाजून 15 मिनिटांनी ते झोपडपट्टीत पोहोचणार आहेत आणि पीएम आवास योजनेतल्या शहरी लाभार्थ्यांशी अर्धा तास संवाद साधणार आहेत.
लाभार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर, 11 वाजून 50 मिनिटांनी गडकाना बस्तीतून निघून ते जनता मैदानाकडे जातील. ओडिशाचे मुख्यमंत्री मोहनचरण मांझी यांच्या नेतृत्वाखालच्या भाजप सरकारने ओडिशातल्या महिलांसाठी तयार केलेल्या बहुप्रतीक्षित सुभद्रा योजनेचं लोकार्पण त्यांच्या हस्ते होईल. भगवान बलभद्र (बलराम) आणि भगवान जगन्नाथ (श्रीकृष्ण) यांची बहीण असलेल्या सुभद्रा देवी यांच्या नावाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत, 21 ते 60 वर्षं वयोगटातल्या सर्व पात्र महिलांना 2024-25 ते 2028-29 या पाच वर्षांमध्ये 50 हजार रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे. दर वर्षी दोन हप्त्यांमध्ये 10 हजार रुपयांची रक्कम थेट महिलांच्या खात्यात जमा केली जाईल. या उपक्रमात एक कोटींहून अधिक महिलांना लाभ मिळेल, अशी शक्यता आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं, की पंतप्रधान मोदी आज 10 लाखांहून अधिक महिलांच्या बँक खात्यांमध्ये निधी हस्तांतरणाची सुरुवात करतील.
या कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदी दुपारी 1 वाजून 5 मिनिटांनी भुवनेश्वर विमानतळाकडे रवाना होतील. दुपारी 1 वाजून 20 मिनिटांनी ते विमानतळावर पोहोचतील आणि 1 वाजून 25 मिनिटांनी वायुसेनेच्या विशेष विमानाने दिल्लीला जातील. दुपारी 3 वाजून 35 मिनिटांनी ते दिल्ली विमानतळावर उतरतील.