बिहारमध्ये एनडीएला निर्विवाद बहुमत मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप मुख्यालयात भाषण केले. संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास मोदी भाजप मुख्यालयात आले. भाजपच्या प्रमुख नेत्यांनी त्यांचे अतिशय उत्साहात स्वागत केले. मोदी-मोदी अशा घोषणांनी भाजप मुख्यालय दुमदुमून गेले. एनडीएच्या विजयासाठी कष्ट केलेल्या भाजप कार्यकर्ते तसेच जेडीयूचे नेते पदाधिकाऱ्यांचा विशेष नामोल्लेख मोदी यांनी केला.
advertisement
छठी मैय्याच्या जयघोषाने भाषणाची सुरुवात
नरेंद्र मोदी यांनी भाषणाची सुरुवात छठी मैय्याच्या जयघोषाने केली. बिहारच्या जनतेने विरोधकांना सपशेल धूळ चारली. बिहारच्या घराघरात आज मखान्याची खीर आहे. आम्ही एनडीएचे लोक जनतेचे सेवक आहोत. सेवा करून जनतेचे हृदय जिंकण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. त्यामुळे बिहारमध्ये पुन्हा एकदा जनतेने एनडीएला निवडून दिले, असे म्हणत बिहारी जनतेचे मोदी यांनी शतश: आभारी मानले. तसेच जयप्रकाश नारायण, भारतरत्न कर्पूरी ठाकूर यांना आदरपूर्वक नमन केले.
मुस्लिम-यादव फॉर्म्युल्यावर सडकून टीका, काँग्रेसपासून दूर राहण्याचा मित्रपक्षांना सल्ला
लोहा लोहे को काटता है असे म्हणतात. बिहारमध्ये काही जणांनी तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी MY अर्थात मुस्लिम-यादव अशा फॉर्म्युल्याची घोषणा दिली. पण एनडीएच्या विजयाने MY अर्थात महिला, यूथ समीकरण अधोरेखित झाले. बिहारच्या जनतेला आता जंगलराज नको तर विकासाचे मंगलराज हवे आहे, असेही मोदी म्हणाले. ज्यांच्यासोबत काँग्रेस असते, त्यांचे मतदार संपविण्याचे काम काँग्रेस करते. आता काँग्रेसच्या मित्रपक्षांनी त्यांच्यापासून सावध व्हावे. आजची काँग्रेस मुस्लिम माओवादी काँग्रेस झालेली आहे, असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना अप्रत्यक्षपणे संदेश दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
बिहारमध्ये गुलाल उधळला, बंगाल आता दूर नाही
दिल्लीत ३० वर्षांनंतर आपण जिंकलो, महाराष्ट्रात सलग दिसऱ्यांदा आपण विजय मिळवला. हरियाणात पुन्हा सत्ता मिळवली. आज बिहारमध्ये जनतेने आपल्याला साथ दिली. बिहारच्या विजयाने बंगालच्या विजयाचा रस्ता खुला झाला आहे. बंगालमधले जंगलराज संपविण्याची वेळ आली आहे , असे सांगत मोदींनी ममता बॅनर्जी यांना खुले आव्हान दिले.
