भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथमच देशाला उद्देशून भाषण केले. भारताने राबवविलेल्या ऑपरेशन सिंदूरची माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली. तसेच दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी कशी झाली, हे देखील मोदींनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात सांगितले.
नरेंद्र मोदी म्हणाले, "ऑपरेशन सिंदूर हे देशाच्या कोटी कोटी लोकांच्या भावनांचे प्रतिबिंब आहे. ऑपरेशन सिंदूर न्यायाची अखंड प्रतिज्ञा आहे. ६ मे ची रात्र, ७ मे ची सकाळ संपूर्ण जगाने बदला काय असतो, हे अनुभवले. पाकिस्तानमधील दहशतवादांचे अड्डे उद्ध्वस्त करून त्यांच्या मनसुब्यांना सुरुंग लावला. त्यांनी स्वप्नातही असा विचार केला नसेल. राष्ट्र सर्वोतपरी मानल्यावर असे निर्णय घेतले जातात. बहावलपूर आणि मुरीदके येथे जागतिक दहशतवादाचे अड्डे बनले होते. जगात कुठेही मोठे दहशतवादी हल्ले झाले होते, त्यांचे कनेक्शन मुरीदकेसोबत जुळलेले होते".
advertisement
भारताने १०० हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले
"दहशतवाद्यांनी आमच्या बहिणींशी सिंदूर पुसले होते. त्यामुळे आपल्या सैनिकांनी त्यांचे तळ उद्ध्वस्त केले. भारताने १०० हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. भारताने एका झटक्यात दहशतवाद्यांची मुख्यालये उद्ध्वस्त केली. पाकिस्तानने दहशतवादाविरोधी लढ्यात भारताला साथ देण्याऐवजी आपल्या विरोधात कारवाई केली. शाळा, कॉलेज, मंदिरे, सामान्य नागरिकांच्या घरांना टार्गेट केले. पाकिस्तानने लष्करी तळांना टार्गेट केले. परंतु यातही पाकिस्तानचा बुरखे फाटले. पाकिस्तानचे ड्रोन, मिसाईलने भारतासमोर नांगी टाकली. पहिल्या तीन दिवसांतच पाकिस्तानला गुडघ्यावर आणले, ज्याचा त्यांनी विचारही केला नव्हता. त्यामुळे दुनियाभरात पाकिस्तान याचना करीत सुटला. तोंडावर आपटल्याच्या विवंचनेतून पाकिस्तानने १० मेच्या दुपारी आपल्या डीजीएमओला फोनवरून संपर्क केला. तोपर्यंत आम्ही शेकडो दहशतवाद्यांना यमसदनी धाडले होते".
"पाकिस्तानकडून विनंती होत असताना भारताने विचार केला. सिंदूर ऑपरेशन केवळ स्थगित केले आहे, येणाऱ्या दिवसांत आम्ही त्यांच्या हालचालींकडे लक्ष ठेवू. पण जर त्यांनी आगळीक केली तर त्यांना जशास तसं उत्तर देऊ"