अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या मध्यस्थीतून भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली. दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले न करण्याचा प्रस्ताव स्विकारला. सीजफायर झाल्याव देखील पाकिस्तानकडून हल्ले होत असल्याच्या बातम्या शनिवारी रात्री उशिरा समोर आल्या. यानंतर भारतीय हवाई दलाने देखील अद्याप ऑपरेशन सिंदूर सुरू असल्याचं ट्विट केलं आहे. यामुळे आता भारत-पाक संघर्षाची स्थिती नेमकी काय आहे? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
advertisement
दरम्यान, काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. त्यांनी या पत्रातून संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे. पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला, त्यानंतर भारतीय सैन्यांकडून राबवलेलं ऑपरेशन सिंदूर पुढे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदीबाबत केलेली घोषणा, यावर चर्चा करण्यासाठी अधिवेशन बोलवावं, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे. याबाबतचं पत्र आता समोर आलं आहे.
राहुल गांधींनी मोदींना लिहिलेल्या पत्रात काय म्हटलं?
राहुल गांधींनी पत्रात म्हटलं की, विरोधी पक्षाने एकमताने संसदेचे विशेष अधिवेशन तत्काळ बोलावण्याची विनंती केली आहे. या विनंतीचा मी पुनरुच्चार करतो. पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदा जाहीर केलेल्या युद्धबंदीवर चर्चा करणं, देशातील जनता आणि लोक प्रतिनिधींना अत्यंत महत्त्वाचे आहे. पुढील आव्हानांना तोंड देण्यासाठी आपला सामूहिक निर्धार दाखवण्याची ही एक संधी असेल. मला विश्वास आहे की तुम्ही या मागणीचा गांभीर्याने आणि लवकरात लवकर विचार कराल.