नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय पातळीवर दीर्घकाळापासूनचा मित्र असलेल्या रशियामुळे भारताच्या चिंतेत वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे भारतासोबत डबल गेम करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. भारताची विनंती, मागणी धुडकावत रशियाकडून पाकिस्तानच्या हवाई दलाला मदत करण्यात येणार आहे. पाकिस्तानच्या हवाई दलातील जेएफ-17 या विमानाला रशिया आपलं इंजिन पुरवणार आहे. यामुळे जेएफ-17 च्या कार्यक्षमतेत वाढ होणार आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर रशियाने हा निर्णय घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.
advertisement
पाकिस्तानचे जेएफ-17 लढाऊ विमान हे चिनी लढाऊ विमान आहे. परंतु उड्डाणासाठी रशियन इंजिनवर अवलंबून असते. हे लढाऊ विमान रशियन आरडी-93एमए इंजिनने चालवले जाते. पण आता, भारत आणि रशियामध्ये या इंजिनवरून वाद निर्माण होऊ शकतो. भारताने रशियाला हे इंजिन पाकिस्तानला न पुरवण्याची विनंती बऱ्याच काळापासून केली आहे. मात्र, समोर आलेल्या काही वृत्तांनुसार, भारताच्या या आक्षेपकांना दुर्लक्ष करून रशियाने पाकिस्तानला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.
रशियाने पाकिस्तानला आरडी-93एमए इंजिन पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. रशियाच्या युनायटेड इंजिन कॉर्पोरेशन (यूईसी)-क्लिमोव्ह यांनी बनवलेले हे प्रगत पॉवरप्लांट, चीनसोबत संयुक्तपणे विकसित केलेल्या पाकिस्तान हवाई दलाच्या सर्वात प्रगत जेएफ-17 थंडर ब्लॉक III लढाऊ विमानांचा कणा आहे.
भारताने रशियाला हे इंजिन थेट पाकिस्तानला विकू नयेत अशी विनंती बऱ्याच काळापासून केली होती. पाकिस्तान हवाई दलाची ताकद आणि आधुनिकीकरण क्षमता या इंजिनमुळे वाढणार आहे. काही वृत्तांनुसार, असा दावा करण्यात आला आहे की अलिकडच्या भारत-पाकिस्तान संघर्षानंतर भारताने रशियाला इंजिन पुरवठा थांबवण्याची विनंतीही केली होती.
रशियाकडून पाकिस्तानला जेट इंजिन...
जेएफ-17 हे 4.5 जनरेशनचे लढाऊ विमान आहे. हे लढाऊ विमान पाकिस्तानने चीनच्या मदतीने तयार केले आहे. या लढाऊ विमानाचे सुरुवातीचे प्रकार, ब्लॉक 1 आणि ब्लॉक 2, बहुतेकदा कमी किमतीचे, मध्यम पल्ल्याच्या लढाऊ विमान म्हणून वर्णन केले जात होते. परंतु ब्लॉक 3 हे एक प्रगत लढाऊ विमान आहे. या प्रकारात एईएसए रडार, हेल्मेट-माउंटेड डिस्प्ले, प्रगत इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली आणि चिनी बनावटीचे पीएल-15 लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा समावेश आहे.
पाकिस्तानचा दावा आहे की जेएफ-17 लढाऊ विमानाची क्षमता राफेल आणि सुखोई-30 एमकेआयच्या क्षमतांशी तुलना करता येईल. मात्र, संरक्षण तज्ज्ञांकडून या दाव्याचे खंडन करण्यात आले आहे. सुखोई-30एमकेआय भारतीय हवाई दलाचा कणा आहे, तसेच जेएफ-१७ हे पाकिस्तानी हवाई दलाचा कणा आहे. पाकिस्तानी लष्कराकडे जेएफ-17 लढाऊ विमानांचा सर्वात मोठा ताफा आहे.
पाकिस्तान देखील जेएफ-17 विकण्याचा प्रयत्न करत आहे. जेएफ-17 रशियाच्या शक्तिशाली आरडी-93एमए इंजिन मिळाल्यास त्याची क्षमता वाढेल आणि बाजारात त्याची मागणी वाढेल.
डिफेन्स सिक्युरिटी एशियाच्या एका अहवालात असा दावा करण्यात आला आहे की RD-93MA इंजिन JF-17 ब्लॉक III साठी गेम-चेंजर ठरू शकते. हे इंजिन जुन्या RD-93 च्या तुलनेत वाढीव थ्रस्ट, सुधारित इंधन कार्यक्षमता, दीर्घ सेवा आयुष्य आणि उच्च थर्मल टॉलरन्स देते. या तांत्रिक सुधारणांमुळे विमान केवळ अवजड पेलोड वाहून नेण्यास सक्षम होणार नाही तर ते अधिक वेगवान देखील बनेल. अहवालानुसार, एअरबोर्न अर्ली वार्निंग सिस्टम आणि नेटवर्क-सेंट्रिक ऑपरेशन्स हे एकत्रित केले जाते तेव्हा हे प्लॅटफॉर्म पाकिस्तानी हवाई दलासाठी महत्त्वपूर्ण बनते.
भारताचा आक्षेप
पाकिस्तानी विमानांसाठी रशियन इंजिनांच्या विक्रीवर भारताने सातत्याने आक्षेप घेतला आहे. 2006 मध्ये रशियन इंजिनांसाठी करार झाला तेव्हा भारतानेही आक्षेप घेतला होता. चीनला RD-93 इंजिन पाकिस्तानला पुन्हा निर्यात करण्याची परवानगी देण्याच्या रशियाच्या निर्णयाचा भारताने निषेध केला. मात्र, रशियाने त्यावेळी युक्तिवाद केला होता की ते इंजिन थेट पाकिस्तानला विकत नाही तर चीनला विकत आहे. रशियाने यापूर्वी भारताला असलेल्या संभाव्य धोक्यांकडे दुर्लक्ष केले होते.