पुतिन यांचे आभार मानत पंतप्रधान मोदींनी भारत नेहमीच संघर्ष मिटवण्यासाठी शांततापूर्ण तोडगा, मुत्सद्देगिरी आणि संवाद या भूमिकेवर ठाम असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केले. भारत या संदर्भात होत असलेल्या सर्व प्रयत्नांना पाठिंबा देतो, असेही त्यांनी सांगितले.
या दोन्ही नेत्यांनी भारत आणि रशिया यांच्यातील विशेष आणि विशेषाधिकार प्राप्त धोरणात्मक भागीदारी (Special and Privileged Strategic Partnership) अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने द्विपक्षीय सहकार्याच्या अनेक मुद्द्यांवरही चर्चा केली.
advertisement
युक्रेन युद्धावर कोणताच तोडगा निघाला नाही
पुतिन यांनी शुक्रवारी अलास्कामध्ये ट्रम्प यांच्यासोबत तीन तास चर्चा केली होती. मात्र या शिखर परिषदेतून युक्रेनमधील युद्धबंदीबाबत कोणताही तोडगा निघाला नाही. या युद्धामुळे हजारो लोक मरण पावले आहेत आणि युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे.
दरम्यान सोमवारी ट्रम्प हे अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन येथे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की आणि इतर अनेक युरोपीय नेत्यांची भेट घेणार आहेत. ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेनमध्ये तातडीची युद्धबंदी होण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. एक थेट शांतता करारच या युद्धाचा अंत करेल, असे त्यांनी म्हटले आहे.
भारताची अधिकृत भूमिका
पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना फोन करण्यापूर्वी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात सांगितले होते की- भारत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातील अलास्का येथील शिखर परिषदेचे स्वागत करतो. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, शांततेच्या प्रयत्नांतील त्यांचे नेतृत्व अत्यंत प्रशंसनीय आहे. शिखर परिषदेत झालेल्या प्रगतीचे भारत कौतुक करतो. यावरील पुढील मार्ग केवळ संवाद आणि मुत्सद्देगिरीतूनच काढला जाऊ शकतो. जगाला युक्रेनमधील संघर्ष लवकर संपलेला पाहायचा आहे.