पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॅबिनेट मंत्री आणि अनेक नेत्यांनी सोमवारी (24 जून) संसद सदस्य म्हणून शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर खासदार लोकसभेचे अधिकृत सदस्य झाले आहेत. त्यामुळे त्यांना अनेक सरकारी सुविधा मिळण्यास सुरुवात झाली आहे. संसदेचं सदस्यत्व मिळाल्यानंतर प्रत्येक खासदाराला राहण्यासाठी लुटियन्स दिल्लीत सरकारी बंगला मिळतो. दरमहा पगार, मोफत विमान, रेल्वे आणि रस्ते प्रवास, मोफत टेलिफोन आणि इंटरनेट सुविधा या सुविधा खासदाराला मिळतात. तसेच, त्यांच्यासह कुटुंबाला मोफत उपचार मिळण्याची देखील सोय असते. निवृत्त झाल्यानंतर प्रत्येक खारदाराला पेन्शन मिळते.
advertisement
प्रत्येक खासदाराला दरमहा एक लाख रुपये पगार मिळतो आणि त्यासोबत इतर अनेक प्रकारचे भत्तेही मिळतात. देशभरात प्रवास करण्यासाठी त्यांना मोफत प्रवास पास आणि टोल फ्री सुविधा उपलब्ध आहेत. खासदार आणि त्यांच्या कुटुंबियांवर सरकारी रुग्णालयात मोफत उपचार केले जातात. या सुविधांमुळे त्यांना आपलं कर्तव्य पार पाडण्यात मदत होते. शासकीय कामासाठी खासदारांना मोफत वाहन सुविधाही दिली जाते. प्रत्येक खासदाराला सभागृहाच्या अधिवेशनात किंवा समितीच्या बैठकीत उपस्थित राहण्यासाठी किंवा संसद सदस्य असण्याशी संबंधित कोणत्याही कामासाठी प्रवास करावा लागला तर त्यासाठी स्वतंत्र भत्ता दिला जातो. एका आकडेवारीनुसार, खासदारांना एक लाख रुपये मासिक वेतन, दोन हजार रुपये मीटिंग भत्ता आणि इतर अनेक भत्ते मिळतात.
प्रत्येक खासदाराला दिल्लीतील निवासस्थानी किंवा दिल्लीतील कार्यालयात टेलिफोन बसवण्यासाठी कोणतंही शुल्क भरावं लागत नाही. या फोनच्या बिलाचा खर्च सरकार करतं. त्याचबरोबर त्यांना 50 हजार मोफत लोकल कॉलची सुविधाही मिळते. कार्यालयीन खर्च भत्ता म्हणून खासदाराला दरमहा 60 हजार रुपये दिले जातात.