हॉटेलमध्ये नोकरीच्या बहाण्याने फसवणूक
मिळालेल्या माहितीनुसार,अविनाश जोशी यांचा मित्र फिरोज सय्यद याने फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर एलाईट इमिकॉन इमिग्रेशन कन्सल्टन्सी या कंपनीची जाहिरात पाहिली होती. या जाहिरातीत व्हिजिट टू वर्क योजनेअंतर्गत हॉटेलमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. यानंतर अविनाश जोशी त्यांची चुलत बहीण मलायका शेरी आणि इतर मित्रांनी मालाड पश्चिम येथील कंपनीच्या कार्यालयाला भेट दिली.
advertisement
तेथे कंपनीचे मालक अजय शर्मा, मॅनेजर रमनदीप जोशी तसेच पार्टनर रुपेश शाह आणि सिद्धार्थ भट यांनी परदेशात नोकरी मिळवून देण्याची प्रक्रिया समजावून सांगत मोठी रक्कम घेतली. माल्डोव्हा देशाचा ई-व्हिसा मिळाल्यानंतरही प्रत्यक्षात कुणालाही नोकरी किंवा परदेश प्रवासाची सोय करण्यात आली नाही.
एका मित्राला माल्डोव्हा पाठवण्यात आले मात्र विमानतळावर क्लिअरन्स न मिळाल्याने त्याला परत पाठवण्यात आले. त्यानंतर कंपनीकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. पुढे रशियाला पाठवण्याचे नवीन आमिष दाखवून आणखी पैसे घेतल्यानंतर आरोपी संपर्काबाहेर गेले. या सर्व प्रकारात एकूण 19 लाख 32 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
