सोने आणि चांदीचे दर सातत्याने वाढण्यामागे अनेक फॅक्टर कारणीभूत आहेत.. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोनं हे गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून मध्यमवर्गीय सोनं खरेदीला प्राधान्य देतात. त्याचबरोबर सोन्यामधून मागील काही महिन्यांमध्ये चांगले रिटर्न्स देखील मिळत आहेत. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर अस्थिरता आहे. इस्त्राईल आणि हमास युद्ध रशिया आणि युक्रेन युद्ध आणि अन्यही ठिकाणी अस्थिरता असल्याने सोन्याच्या दरावर परिणाम होत आहे.
advertisement
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशांवर लावलेले आयात कर हे देखील सोन्याच्या दरामध्ये होत असलेल्या दरवाढीला कारणीभूत ठरत आहेत.त्याचबरोबर सर्व देशांच्या केंद्रीय बँका गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून आणि आपल्या देशाच्या राष्ट्रीय चलनांना मजबुती यावी म्हणून सोन्याची खरेदी करत आहे. हे सगळे घटक सोन्याच्या दरामध्ये वाढ होण्यास पूरक ठरत आहेत. यामुळेच सोने दरवाढीचा ट्रेंड हा असाच कायम राहण्याची शक्यता आहे.
जालना सराफा बाजारामध्ये सोन्याचे दर हे एक लाख 13 हजार रुपये प्रति तोळा एवढे आहेत. तर चांदी एक लाख 32 हजार रुपये प्रति किलो अशी आहे. दिवाळीपर्यंत सोन्याचे दर हे एक लाख वीस ते एक लाख 25 हजार रुपयांच्या दरम्यान असतील तर चांदीचे दर एक लाख चाळीस ते एक लाख 50 हजार रुपये प्रति किलो या दरम्यान राहण्याची शक्यता अधिक असल्याचं जालना सराफा असोसिएशनचे सचिव गिरीधर लधानी यांनी लोकल एटीन बरोबर बोलताना सांगितलं