परक्या देशात शिरुन एखादी मोहीम राबवण्यासाठी मोसाद अनेक पद्घतींचा अवलंब करते. गुप्त माहितीचं संकलन, गुप्त मोहिमा आणि संपत्ती सारख्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करुन अत्यंत खुबीने मोसाद आपल्या कारवाया पूर्णत्वाला नेते. त्यासाठी आठवड्याभरापासून ते अगदी वर्षभराचा वेळ घेते. सहसा मोसादच्या प्रत्येक ऑपरेशनची माहिती इस्रायलच्या पंतप्रधानांना दिली जाते.
जगातील सर्वच गुप्तचर यंत्रणांप्रमाणेच मोसादही एखाद्या बनावट नावाचा किंवा आयडीचा वापर करते. मोसादचे एजंट्स एका खास नेटवर्कने एकमेकांशी जोडलेले असतात. त्यामुळे जगभर कुठेही कुठलीही साधनं मिळवताना त्यांना शक्यतो कुठलीही अडचण येत नाही. परदेशातील मोहिमांसाठी मोसाद सहसा स्थानिक माहीतगार आणि कर्मचारी नेमते. त्यातील अनेकांना मोसादचे एजंट्स आधीच ओळखत असतात. किंवा ओळखीच्या मध्यस्थांच्या मदतीने या नेमणुका केल्या जातात. ‘केसारिया’ ही मोसादची ऑपरेशनल विंग असून ती प्रामुख्याने अरब देशांमध्ये गुप्तचर नेमते आणि त्यांना मॅनेज करते. त्या गुप्तचरांच्या मदतीने कितीतरी महत्त्वाची माहिती मोसादला मिळते. ‘टार्गेट मर्डर’ करण्यासाठी मोसाद कुख्यात आहे. इस्रायलच्या सुरक्षेला धोका पोहोचवतील अशा व्यक्तींचा खात्मा करण्यासाठी मोसाद अगदी कोणत्याही थराला जाऊ शकते. अशा कितीतरी घटना जगाला ज्ञात आहेत. मोसादच्या किडॉन युनिटमार्फत या हत्या केल्या जातात. ते फक्त हत्या करत नाहीत तर अगदी तोडफोडही करतात. विशेष जोखमीच्या मोहिमा त्यांच्यावर सोपवल्या जातात. अर्थात अशा जोखमीच्या कारवायांपूर्वी मोसादला इस्रायली पंतप्रधानांची परवानगी घेणं बंधनकारक असतं.
advertisement
आपल्या टार्गेट्सवर लक्ष ठेवून कारवाई यशस्वी करण्यासाठी मोसाद गुप्त माहितीचं संकलन करत असते. ही माहिती मिळवण्यासाठी ड्रोनपासून ते सॅटेलाईट्स आणि अगदी इलेक्ट्रॉनिक उपकरणांची मदतही घेतली जाते. सायबर क्षमतांचा अत्यंत प्रभावी वापर मोसादकडून केला जातो. त्याबरोबरच इतर गुप्तचर संघटनांची मदतही मोसादकडून आवर्जून घेतली जाते. अशी मदत घेऊन आपली क्षमता वाढवण्याचा मोसादचा प्रयत्न असतो. सीरियन सरकारमध्ये मोसादच्या एली कोहेन नामक एजंटने उच्चस्तरीय व्यावसायिकाच्या रुपात घुसखोरी केली होती. त्या गटात अनेक सीरियन मंत्री होते, त्यामुळे सीरियाबाबत बरीच महत्त्वाची माहिती इस्रायलला मिळत असे. ही 1960 च्या दशकातील घटना आहे.
2020 मध्ये मोसादने इराणचे अणुशास्त्रज्ञ ब्रिगेडियर जनरल मोहसीन फकरी जादेह यांची हत्या केली. या हत्येसाठी अत्यंत ॲडव्हान्स्ड टेक्निक वापरण्यात आलं होतं. या घटनेमुळे मोसादच्या योजना आणि अंमलबजावणीची झलक पुन्हा एकदा जगासमोर आली होती. 2018 मध्ये मोसादने तेहरानच्या एका गोदामातून इराणच्या न्युक्लियर अर्काईव्ह्ज चोरण्यासाठी एक मोहीम आखली आणि पूर्णत्वास नेली. या ऑपरेशनमध्ये 20 एजंट्स सहभागी होते.
माहिती संकलनासाठी मोसाद मानवी बुद्धिमत्ता आणि तांत्रिक साधनांवर अवलंबून आहे. त्यासाठी मोसादने अनेक स्रोत जोडले आहेत. यात शत्रुदेशातील फरार किंवा माहीतगार व्यक्तींचाही समावेश आहे. ते वेळोवेळी मोसादला सहकार्य करतात. मोसाद ही ऑटोनॉमस पद्धतीने काम करते. तिला घुसखोरी आणि ऑपरेशन्सबाबत निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे नोकरशाहीतील अडचणींचा सामना तिला करावा लागत नाही. याविरुद्ध अमेरिकन सीआयएची रचना गुंतागुंतीची आहे. ती सनदशीर मार्गाने काम करते. तिला अनेक परवानग्या घेणं शिवाय कायद्याला धरुन काम करणं आवश्यक आहे. त्यामुळे तिचं काम संथगतीने चालतं.
मोसाद जगभर प्रामुख्याने ‘टार्गेट मर्डर’ साठी ओळखली जाते. इस्रायलच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या व्यक्तींविरुद्घ ती कारवाई करते. सीआयएसारख्या इतर गुप्तचर संघटनाही असे ‘टार्गेट मर्डर’ करतात; पण सहसा त्या कायद्याच्या कक्षेत राहून काम करण्याला प्राधान्य देतात. त्यामुळे मोसाद ही इतर गुप्तचर संघटनांपेक्षा वेगळी ठरते.