अंबरनाथच्या शिवमंदिरात कसं जायचं?
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये हे प्राचीन शिव मंदिर आहे. अंबरनाथला जाण्यासाठी जर तुम्ही मुंबईवरून जाणार असाल तर मध्य रेल्वेवरील दादर स्थानकावरून खोपोली, कर्जत, बदलापूर किंवा अंबरनाथ या लोकल पकडू शकता. जलद किंवा धीमी लोकल पकडलीत तरी सुद्धा चालेल. तुम्हाला अंबरनाथला पोहोचण्यासाठी एक ते दीड तासांचा अवधी लागतो. अंबरनाथ पूर्वेमध्ये हे मंदिर असून तुम्हाला पुढे जाण्यासाठी अंबरनाथ रेल्वे स्थानकापासून रिक्षा ऑटो देखील मिळते. रेल्वे स्थानकावरून शिव मंदिरामध्ये जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रिक्षा सुविधा उपलब्ध असतात. तिथून तुम्ही रिक्षाने थेट मंदिरापर्यंत जाऊ शकतात. मंदिरामध्ये जाण्यासाठी एका व्यक्तीचं 15 ते 20 रूपये इतकं भाडं आहे. अंबरनाथ स्टेशनपासून मंदिरामध्ये जाण्यासाठी ऑटो रिक्षाने 9 ते 10 मिनिटांचा वेळ लागतो.
advertisement
966 वर्षे जुनं असलेल्या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणावर भाविकांची मांदियाळी असते. दरवर्षी लाखो भाविक इथे दर्शनासाठी येत असतात. ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी जत्राही त्याच दिवशी भरली जाते. जत्रेनिमित्त प्राचीन शिवमंदिरामध्ये भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर ट्रस्ट जोरदार तयारी केले जाते. शिवाय, अनेक बडे सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांचीही यावेळी रेलचेल पाहायला मिळते. फक्त महाशिवरात्रीच्या वेळी नाही तर, इतरत्र वेळीही शिवमंदिरामध्ये भाविकांची रेलचेल असते. भाविकांच्या दृष्टीने कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी मंदिर ट्रस्टकडून पुर्णपणे तयारी सुरू आहे. पाणी, प्रसाद यांसह इतरत्र गोष्टींची सोय सुद्धा मंदिर प्रशासनाकडून केली जात आहे. मंदिरामध्ये दर्शनाकरिता येणार्या भाविकांसाठी मंदिर परिसरामध्ये मंडप घालण्यात आला आहे. भाविकांच्या दर्शनासाठी एकत्रितपणे गर्दी होऊ नये, याची काळजी मंदिर प्रशासनाकडून घेतली जात आहे.
मंदिर परिसरामध्ये चेंगरा चेंगरी सदृश परिस्थिती होऊ नये, यासाठी मंदिर प्रशासन, पोलीस प्रशासन आणि स्थानिक प्रशासन यांच्याकडून काळजी घेतली जात आहे. शिव मंदिर परिसरात स्वच्छतेची ही मोठ्या प्रमाणावर काळजी घेतली गेली आहे. भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, या दृष्टीने पोलिसांचा चोख बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
