भारत कायमच ज्ञानयोगाच्या मार्गावरून समर्पण भावनेनं वाटचाल करत आला आहे असे सांगून पंतप्रधान म्हणाले, हजारो वर्षे प्राचीन वेद आजही प्रेरणा देत आहेत. आपल्या संत आणि महर्षींनी काळाची गरज ओळखून वेदांच्या मार्गदर्शनातून विविध व्यवस्था विकसित केल्या. वेदांतून उपनिषदे आली, उपनिषदांतून पुराणे आली तसेच श्रुती, स्मृती, कथावाचन तसेच गायनाच्या माध्यमातूनही परंपरेचे सामर्थ्य टिकून राहीले, असे त्यांनी नमूद केले.
advertisement
वेगवेगळ्या कालखंडात महान संत, ऋषी आणि विचारवंतांनी काळाच्या गरजेनुसार या परंपरेत नव्या अध्यायांची भर घातली. भगवान स्वामीनारायण यांचा जीवनपट हा, लोकशिक्षण आणि जनसेवेशी दृढतेने जोडलेला होता, हे आपण सगळेच जाणत असल्याचे त्यांनी नमूद केले. भगवान स्वामीनारायण यांनी आपले असे सर्व अनुभव साध्या शब्दांत मांडले, शिक्षापत्रीच्या माध्यमातून त्यांनी जगण्यासाठेचे अमूल्य मार्गदर्शन केले, ही बाबही पंतप्रधानांनी नमूद केली.
द्विशताब्दी सोहळा हा शिक्षणपत्रीतून कोणते नवीन धडे शिकले जात आहेत आणि त्यातील आदर्शांचे दैनंदिन जीवनात कसे पालन केले जात आहे, याचा आढावा घेण्याची संधी देत असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. भगवान स्वामीनारायण यांचे जीवन हे आध्यात्मिक साधना आणि सेवाभाव या दोन्हींचे प्रतीक होते, असे त्यांनी नमूद केले. आज त्यांच्या अनुयायांकडून समाज, राष्ट्र आणि मानवतेसाठी समर्पित अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत, असेही त्यांनी सांगितले. शिक्षण आणि आरोग्याशी संबंधित प्रकल्प, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठीच्या वचनबद्धता आणि पाण्याशी संबंधित उपक्रम खरोखरच प्रशंसनीय आहेत, असेही ते म्हणाले. संतगण सामाजिक सेवेप्रती आपली जबाबदारी सातत्याने वाढवत असल्याचे पाहणे खूप प्रेरणादायी आहे, असे त्यांनी नमूद केले.
देशभरात स्वदेशी आणि स्वच्छतेसारख्या जनआंदोलनांना गती मिळत असल्याचे अधोरेखित करून, पंतप्रधान म्हणाले की, ‘व्होकल फॉर लोकल‘ या मंत्राचा नाद प्रत्येक घराघरात पोहोचत आहे. ज्यावेळी या प्रयत्नांना अशा उपक्रमांची जोड मिळेल त्यावेळी शिक्षणपत्रीचा द्विशताब्दी सोहळा आणखी अविस्मरणीय ठरेल, असे त्यांनी सांगितले. देशाने प्राचीन हस्तलिखितांच्या संरक्षणासाठी ‘ज्ञान भारतम् अभियान‘ सुरू केले आहे, असे सांगून त्यांनी सर्व प्रबुद्ध संस्थांना या कार्यात अधिक सहकार्य करण्याचे आवाहन केले. भारताचे प्राचीन ज्ञान आणि त्याची ओळख जपली पाहिजे आणि अशा संस्थांच्या सहकार्याने ‘ज्ञान भारतम अभियाना‘चे यश नवीन उंचीवर पोहोचेल, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
देश सध्या सोमनाथ स्वाभिमान उत्सवानिमित्त भव्य सांस्कृतिक उत्सव साजरा करत असल्याकडे लक्ष वेधत पंतप्रधान म्हणाले की, सोमनाथ मंदिराच्या पहिल्या विध्वंसापासून ते आतापर्यंतचा हजार वर्षांचा प्रवास देश या उत्सवाद्वारे साजरा करत आहे. पंतप्रधानांनी सर्वांना या उत्सवात सहभागी होण्याचे आणि त्याचे उद्दिष्ट जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. अनुयायांच्या प्रयत्नांमुळे भारताच्या विकासाच्या प्रवासाला भगवान स्वामीनारायणांचा आशीर्वाद मिळत राहील, असा विश्वास व्यक्त करून त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
