सकाळी 9.20 वाजेपर्यंत भाजपने 28 जागांवर आघाडी मिळवली आहे. भाजपने जम्मू भागात चांगले यश मिळवले आहे. तर दुसरीकडे नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस आघाडीला 46 जागांवर आघाडी असल्याचे दिसून आले. तर पीडीपी आणि इतर पक्ष, अपक्ष 16 जागांवर आघाडीवर आहे.
ओमर अब्दुला यांनी काय सांगितले?
नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुला यांनी म्हटले की, निकाल आमच्या बाजूने लागतील असा विश्वास आहे. पीडीपीसोबत आम्ही संपर्क केला नाही आणि त्यांनी देखील आमच्यासोबत संपर्क साधला नाही. दुपारी निकाल स्पष्ट झाल्यानंतर आपण अधिक भाष्य करू असे ओमर अब्दुला यांनी सांगितले.
advertisement
जम्मू-काश्मीरमध्ये 10 वर्षानंतर निवडणुका पार पडत आहेत. केंद्र सरकारला राज्याला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर या निवडणुका होत असल्याने या निवडणुकांना अधिक महत्त्व आले आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर रोजी मतदान झाले. निवडणुकीचा निकाल हा 8 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार तीन टप्प्यात झालेल्या मतदानाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. राज्यातील 90 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 63.88 टक्के लोकांनी मतदानाचा हक्क बजावला.
कोणते मुद्दे होते प्रचारात?
जम्मू काश्मीरच्या निवडणुकीत कलम 370, विकास, रोजगाराचा मुद्दा प्रचारात मुख्य होता. भाजपाने कलम ३७० हटवल्याच्या समर्थनात बाजू मांडली. जम्मू-काश्मीरच्या भविष्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय असल्याचे भाजपने प्रचारात सांगितले. लोकसभा निवडणुकीत तुरुंगात असलेल्या रशीद इंजिनियरच्या विजयानंतर फुटीरतावाद्यांमध्ये निवडणूक प्रक्रियेबाबत आत्मविश्वास निर्माण झाला आहे. कलम 370 हटवल्यानंतर राज्यात प्रथमच वाल्मिकी समाजानेही मतदानाचा हक्क बजावला आहे. विधानसभा निवडणुकीत पहिल्या मतदानाबाबत निवडणुकीदरम्यान या समाजात प्रचंड उत्साह दिसून आला.