रत्नागिरी - सिंधुदुर्ग जागेवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भाजपकडून उमेदवारी जवळपास निश्चित मानलं जात आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे या जागेवर लढणार असून इथे भाजप विरुद्ध शिवसेना उबाठा असा सामना रंगणार आहे. नारायण राणे यांच्या उमेदवारीची आज घोषणा होणार आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये शिवसेना उबाठा गटाकडून विनायक राऊत हे मैदानात असणार आहेत.
advertisement
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात २००९मध्ये निलेश राणे हे निवडून आले होते. पण त्यानंतर २०१४, २०१९ च्या लोकसभेला निलेश राणेंना पराभवाचा धक्का बसला. आता यावेळी नारायण राणेंची वर्णी लागण्याची शक्यता असून राणे कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये याआधी शिवसेनेनं जागा लढली होती त्यामुळे शिवसेनाच लढावी अशी इच्छा मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली होती. सामंत यांना रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर शिवसेनेचा दावा सांगितला होता. दुसऱ्या बाजूला नारायण राणेंनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची जागा भाजपची असल्याचं म्हटलं होतं.
दुसऱ्या टप्प्यासाठी अधिसूचना जारी झाली असून आजपासून उमेदवार अर्ज दाखल करू शकणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 88 जागांवर मतदान होणार आहे. याशिवाय, त्याच टप्प्यात बाह्य मणिपूर लोकसभेच्या एका भागात 13 विधानसभा जागांवरही मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील 8 लोकसभा मतदार संघात देखील मतदान होणार आहे.
