पुणे : पुण्यामध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये काही केल्या कमी होत नाही. मारामारी, खून आणि कोयत्या नाचवणाऱ्या टोळ्यांनी पुण्यात उच्छाद मांडला आहे. एवढंच नाहीतर छोट्या मोठ्या टोळ्यांमध्ये वारंवार हल्ले होत आहे. अशातच सिंहगड रोड परिसरात मुळशी सिनेमाला लाजवेल अशी घटना घडली आहे. तीन तरुणांनी मिळून एका तरुणावर भर रस्त्यावर कोयत्याने वार करून संपवलं आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील सिंहगड रोड परिसरात संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. सिंहगड रोड पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली. करण गिरीश काशीद (वय.१९) असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. करण हा सिंहगड परिसरातच राहणार होता. रस्त्यावरून जात असताना ३ तरुणांनी करण काशीदला घेरलं आणि कोयत्याने सपासप वार केले. भर रस्त्यावर कोयत्याने वार करून करणची हत्या करण्यात आली.
करणची हत्या करून हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. करण काशीदचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. जुन्या वादातून कऱण काशीदची हत्या करण्यात आली, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. दोन गँगमधील वादातून ही घटना घडली असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. शहरात नाकाबंदी करण्यात आली असून आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची पथक रवाना केले असल्याची वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची माहिती दिली आहे.
