मयूर कुंभार, मुसा शेख, रोहित अखाड आणि गणेश राऊत असं अटक केलेल्या चार आरोपींची नावं आहेत. या चारजणांसोबत आणखी एका अज्ञात व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. हे पाचही आरोपी घायवळ टोळीचे सदस्य आहेत. त्यांची पुण्यात मोठ्या प्रमाणात दहशत आहे. हे पाचही आरोपी बुधवारी रात्री उशिरा कोथरुड भागात आले होते. यावेळी त्यांच्या गाडीला साईड न दिल्याच्या कारणातून पाच जणांनी एका व्यक्तीशी वाद घातला.
advertisement
हा वाद विकोपाला जाताच घायवळ टोळीतील पाचपैकी एकाने संबंधित कार चालकावर गोळीबार केला. यातील एक गोळी चालकाला लागली आहे. गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आहे. प्रकाश धुमाळ असं गोळीबार झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. त्यांच्या मांडीत गोळी लागली आहे. गोळीबार झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने धुमाळ यांना पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं.
या हल्ल्यानंतर पाचही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. पण गोळीबाराची घटना समोर आल्यानंतर अवघ्या काही तासातच पोलिसांनी मोठी कारवाई केली. गोळीबाराच्या ठिकाणी उपस्थितीत असलेल्या घायवळ टोळीच्या पाचही जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. कोथरुड पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.