बजाज पुणे ग्रँड टूरचे विजेते संघ
चौथ्या टप्प्यात सायकलपटूंनी पुणे शहरातून 95 किलोमीटरचा प्रवास केला. या टप्प्यात 578 मीटर उंचीची चढाई पार केली .या स्पर्धेत एकूण 437 किलोमीटर अंतर स्पर्धकांनी पार केले. ली निंग स्टार संघाने चीनचे प्रतिनिधित्व करत 28 तास 41 मिनिटे 19 सेकंदात प्रथम स्थान पटकावले. ल्यूक मुडग्वेच्या मेहनतीमुळे संघाने सर्व टप्प्यांत वर्चस्व राखले. दुसऱ्या क्रमांकावर स्पेनचा बर्गोस बर्पेललेट बीएच संघ (28 तास 42 मिनिटे 9 सेकंद) तर तिसऱ्या क्रमांकावर मलेशियाचा तेरेंगानू सायकलिंग संघ (28 तास 48 मिनिटे 19 सेकंद) राहिला.चौथ्या टप्प्यात ली निंग स्टार संघाचा ॲलिक्सेई प्रथम, त्याचा सहकारी निकोलस स्कॉट दुसरा आणि रूजाई इन्शुरन्स विनस्पीड संघाचा डायलन हॉपकिन्स तिसरा आला.
advertisement
मूळचा न्यूझीलंडचा सायकलपटू ल्यूक मुडग्वे चीनच्या ली निंग स्टार संघातून स्पर्धेत सहभागी झाला होता. 35 खंडांतील 164 सायकलपटूंशी स्पर्धा करत त्याचा एकूण वेळ 9 तास 33 मिनिटे 04 सेकंद होती. त्याचा जवळचा प्रतिस्पर्धी थायलंडच्या रूजाई इन्शुरन्स विनस्पीड संघाचा एलन कार्टर बेटल्स फक्त 14 सेकंदांनी मागे राहिला. बेल्जियमच्या ‘टार्टेलेटो-आयसोरेक्स’ संघाचा योर्बेन लॉरीसेन 33 सेकंदांच्या फरकाने तिसऱ्या स्थानावर राहिला.ल्यूकने पहिल्या दिवशी ‘मुळशी-मावळ माईल्स’च्या टप्प्यात ‘यलो जर्सी’ आपल्या नावावर केली होती आणि ती शेवटपर्यंत कोणालाही मिळवू दिली नाही. सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याने स्पर्धेत सर्वाधिक गुण मिळवणारा खेळाडू म्हणून ‘ग्रीन जर्सी’ देखील पटकावली.
इतर विजेते
- पोलका डॉट जर्सी (किंग ऑफ द माउंटेन्स): बर्गोस बर्पेललेट बीएच संघाच्या क्लेमेंट अलेनो
- ऑरेंज जर्सी (सर्वोत्कृष्ट आशियाई सायकलस्वार): बर्गोस बर्पेललेट बीएच संघाच्याच जंबलजाम्ट्स सैनबायर
- व्हाईट जर्सी (सर्वोत्कृष्ट युवा सायकलस्वार): नेदरलँड्सच्या तिज्सेन विगो
- ब्लू जर्सी (सर्वोत्कृष्ट भारतीय सायकलस्वार): हर्षवीर सिंग सेखॉन
- सर्वोत्तम तीन भारतीय - हर्षवीर सिंग सेखॉन, मानव सारडा, दिनेश कुमार
