अशी झाली कारवाई
पोलीस अधीक्षक संदीपसिंह गील यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती विभागात १६ पोलीस ठाण्यांतर्गत कडक नाकाबंदी आणि रात्रगस्त सुरू होती. या मोहिमेमुळे घाबरलेल्या तस्करांनी गांजाचा साठा टाकून पळ काढला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. शनिवारी (२८ फेब्रुवारी) पोलिसांना जळोची रस्त्यावरील एका भूखंडात १५०० लिटर क्षमतेच्या दोन टाक्या (ड्रम) संशयास्पदरीत्या लॉक करून ठेवल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी पंचांसमक्ष या टाक्यांची झडती घेतली असता, त्यात गांजाची पाकिटे आढळून आली.
advertisement
२ कोटी ३५ लाखांचा साठा
अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या टाक्यांमध्ये एकूण ४७० किलो गांजा होता. ५० हजार रुपये प्रति किलो या दराने याची एकूण किंमत २ कोटी ३५ लाख रुपये आहे. पोलिसांनी हा सर्व साठा जप्त केला असून अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार कारवाई सुरू केली आहे.
मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू
हा गांजा कोठून आला आणि तो कोणाला पुरवला जाणार होता, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली आहेत. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, परिसरात कोणत्याही संशयास्पद हालचाली किंवा साठा आढळल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. प्रभारी पोलीस निरीक्षक चिवडशेट्टी आणि त्यांच्या पथकाच्या सतर्कतेमुळे हा मोठा साठा उघडकीस आला आहे.
