दुर्गामाता महिला बचत गटाच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांपासून गोधडीचा व्यवसाय सुरू आहे. या गोधडीच्या व्यवसायातून प्रामुख्याने आदिवासी महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना हाताला काम मिळावे आणि त्यांच्या कुटुंबाला आधार मिळावा, या उद्देशाने या व्यवसायाची सुरुवात करण्यात आली. महिलांकडून पारंपरिक पद्धतीने हाताने गोधड्या शिवून घेतल्या जातात. या गोधड्या पूर्णपणे हँडमेड असून, त्यामध्ये महिलांचे कौशल्य, मेहनत आणि पारंपरिक कलात्मकता दिसून येते.
advertisement
आदिवासी महिला या गोधड्यांमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा उपयोग महिला मुलांच्या शिक्षणासाठी तसेच घरखर्चाला हातभार लावण्यासाठी होत आहे. त्यामुळे हा व्यवसाय केवळ उत्पन्नाचा स्रोत न राहता, महिलांच्या सक्षमीकरणाचे प्रभावी साधन ठरत आहे. दुर्गामाता महिला बचत गटामार्फत 20 पेक्षा अधिक प्रकारच्या डिझाइनमध्ये गोधड्या तयार केल्या जातात. रंगसंगती, नक्षीकाम आणि टिकाऊपणा यामुळे या गोधड्यांना ग्राहकांची विशेष पसंती मिळत आहे. महाराष्ट्रभर या गोधड्यांना मोठी मागणी असून, भीमथडी जत्रेमुळे त्यांना अधिक व्यापक बाजारपेठ मिळाली आहे.
महिलांना हाताने शिवलेल्या गोधड्यांच्या किंमती 1600 रुपयांपासून सुरू होत आहे. गुणवत्तेनुसार त्यामध्ये बदल होताना दिसत आहे. सध्या या व्यवसायाच्या माध्यमातून 150 पेक्षा अधिक महिलांना थेट रोजगार मिळत आहे, अशी माहिती दुर्गामाता महिला बचत गटाच्या प्रतिनिधी मनिषा भालेराव यांनी दिली. भीमथडी जत्रेसारख्या उपक्रमांमुळे ग्रामीण आणि आदिवासी भागातील महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळत असून, त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग सुकर होत आहे. दुर्गामाता महिला बचत गटाचा गोधडी व्यवसाय हा महिला उद्योजकतेचे आणि सामाजिकतेचे एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.