व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे रविवार शहरातील काही हिंदू संघटनांनी आक्रमक भूमिका घेत शनिवारवाड्याच्या आवारात निदर्शने केली. शनिवारवाडा ही भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI) विभागाची संरक्षित वास्तू आहे. अशा ऐतिहासिक ठिकाणी कोणताही धार्मिक विधी किंवा प्रार्थना करण्यास कायद्याने मनाई आहे. त्यामुळे या प्रकाराची कसून चौकशी करून संबंधितांविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती.
advertisement
हा व्हिडिओ मागील एक-दोन दिवसांतील असल्याचे सांगण्यात येत आहे. शनिवारवाड्याच्या आवारात महिलांनी सामूहिक प्रार्थना केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, धार्मिक भावना दुखावल्याचा आणि पुरातत्त्व विभागाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत अनेक संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला.
या सर्व घडामोडींनंतर, पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून रात्री उशिरा विश्रामबाग पोलिसांना अधिकृत तक्रार प्राप्त झाली. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी तातडीने अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी विश्रामबाग पोलीस करत आहेत. पोलिसांनी आता या अज्ञात महिलांचा शोध सुरू केला आहे. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या महिलांची ओळख पटवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.