वाहनावरील नियंत्रण सुटलं अन्...
आर्यनची आई याच डांबरीकरणाच्या कामावर मजूर म्हणून काम करत होती. मिळालेल्या माहितीनुसार, रोड रोलर चालक आपले काम लवकर उरकण्याच्या घाईत होता. रोलर फिरवण्याचा वेग जास्त असल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि खेळत असलेला आर्यन रोलरच्या चाकाखाली आला. या भीषण अपघातानंतर घाबरलेला रोड रोलर चालक घटनास्थळावरून पळून गेला असून पोलीस आता त्याचा शोध घेत आहेत.
advertisement
सार्वजनिक बांधकाम विभागाचा हलगर्जीपणा
या अपघातासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. रस्ता डांबरीकरणाचे काम सुरू असताना वाहतूक बंद करणे किंवा सुरक्षेसाठी कठडे उभारणे आवश्यक होते. मात्र, विभागाने कोणतेही सूचनाफलक न लावता किंवा रस्ता बंद न करताच काम सुरू ठेवले होते. प्रशासकीय नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या या कामामुळे एका निष्पाप बालकाला आपला जीव गमवावा लागला.
कंत्राटदाराचे सुपरवायझर गायब
धक्कादायक बाब म्हणजे, ज्या वेळी हा अपघात घडला, तेव्हा बांधकाम विभागाचे कोणतेही अधिकारी किंवा कंत्राटदाराचे सुपरवायझर घटनास्थळी उपस्थित नव्हते. आर्यनच्या मृत्यूनंतरही संबंधित जबाबदार व्यक्तींनी तिथे फिरकण्याची तसदी घेतली नाही. कामाच्या ठिकाणी सुरक्षात्मक उपाययोजना शून्य असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. प्रशासकीय अनस्थेमुळे एका गरीब कुटुंबाचे बाळ हिरावले गेल्याने संताप व्यक्त होत आहे.
अपघाताचा गुन्हा दाखल
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी अपघाताचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. मात्र, मजुरी करून पोट भरणाऱ्या पालकांनी आपल्या डोळ्यादेखत मुलाचा असा अंत पाहिल्याने परिसरात मोठी शांतता पसरली आहे. संबंधित कंत्राटदार आणि निष्काळजी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
