पुणे : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव आणि जुन्नर तालुका हा शेतीप्रधान तालुका असून या तालुक्यात वर्षभर शेतात पिके घेतली जातात. सर्वप्रकारची तरकारी पिके पिकविणाऱ्या या भागातील शेतकऱ्यांना आपल्या शेतात पिकांवर औषध फवारणीला आणि तणनाशके फवारणीला मजूर मिळत नव्हते. शेतकऱ्यांची हीच अडचण लक्षात घेऊन जुन्नर तालुक्यातील सावरगाव आणि वडज या गावातील शिवाजी केवळ, संजय केदार, पांडुरंग केवळ, अनिल लांडे आणि मोहम्मद इनामदार या पाच युवकांनी एकत्र येत पाच वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या शेतात औषध फवारणी करण्याचा व्यवसाय सुरू केला.
advertisement
युवकांनी सुरू केलेल्या या आगळ्या वेगळ्या व्यवसायाला शेतकऱ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळत गेला. गेल्या पाच वर्षांपासून हे युवक आपली घरची आणि आपल्या शेतातली कामे करून फावल्या वेळात आंबेगाव शिवाय जुन्नर तालुक्यातील इतर शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांवर उधाडी पद्धतीने औषध फवारणी करून देण्याची कामे करत आहेत.
उसाच्या शेतात जर औषध फवारणी करायची असेल तर हे युवक औषध फवारणीच्या एका टाकीसाठी शंभर रुपये चार्ज आकारतात. तर इतर पिकांसाठी अंतरानुसार साठ ते सत्तर रुपये प्रति टाकी प्रमाणे हे युवक औषध फवारणी करून देतात. शेतीपिकांवर औषध फवारणीच्या या व्यवसायातून या युवकांना दर महिन्याला प्रत्येकी पंधरा ते वीस हजार रुपयांची कमाई होत आहे. या युवकांचा आदर्श घेऊन आता या भागातील इतर युवकांनीही शेतात औषध हा व्यवसाय करण्यास सुरुवात केली आहे.