पतंग उडवण्याचा हा खेळच मुलाच्या जीवावर बेतला. ११ वर्षांच्या मुलासोबत धक्कादायक प्रकार घडला. पतंग खेळायला घराबाहेर गेलेला मुलगा घरी परतलाच नाही. त्याच्यासोबत धक्कादायक घडलं, कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला.
बुधवारी सायंकाळी पतंग खेळायला घराबाहेर पडलेला प्रकाश डबले भुल आज सकाळी ससाणेनगर येथील रेल्वे मार्गावर मृत अवस्थेत आढळला. रेल्वे खाली सापडून त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. प्रकाश हा मूळचा नेपाळचा असून, हडपसरच्या ससाणेनगर भागात राहत होता. संध्याकाळी सहाच्या सुमारास तो पतंग खेळायला गेला. अंधार होऊनही प्रकाश घरी न परतल्याने कुटुंबाची चिंता वाढली. मुलाचा कुटुंबियांकडून शोध घेण्यात आला, पण तो कुठेही सापडला नाही.
advertisement
लेकराला शोधण्यासाठी रात्रभर तळमळल्यानंतर अखेरीस वडिलांनी काळेपडवळ पोलीस ठाण्यात प्रकाश बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनीही रात्री शोध घेण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी सकाळी सव्वासातच्या सुमारास रेल्वे मार्गावर काम करणाऱ्या ट्रकमन प्रमोद सक्ससेना यांना ससाणेनगर येथील रेल्वे मार्गावर प्रकाशचा मृतदेह आढळला. त्यांनी लगेचच पोलिसांना याची माहिती दिली.
केवळ ११ वर्षांचे प्रकाश, खेळण्याच्या वयातील एका मुलाचा इतका भीषण अंत व्हावा, ही घटना मन सुन्न करणारी आहे. पतंग खेळताना रेल्वे मार्गाच्या दिशेने गेला असावा आणि अनवधानाने तो रेल्वेखाली सापडला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेमुळे पाठीमागे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मुलाचा मृतदेह पाहून आईनं टाहो फोडला.
