मिळालेल्या माहितीनुसार, थायलंडहून पुण्यात एक आयात मालाचा कंटेनर आला होता. कागदपत्रांवर या मालामध्ये 'चिनी खाद्यपदार्थ' असल्याचे सांगण्यात आले होते. 'मँडरिन ऑरेंज सॅक्स' या नावाने हा माल पांढऱ्या थर्माकोल बॉक्समध्ये अत्यंत सुरक्षितपणे पॅक केला होता. मात्र, कस्टम्सच्या अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी या बॉक्सचे स्कॅनिंग केले. स्कॅनिंगमध्ये मालाचे स्वरूप नैसर्गिक नसल्याचे लक्षात येताच अधिकाऱ्यांनी तपासणीचा फास आवळला.
advertisement
अधिकाऱ्यांनी जेव्हा एक बॉक्स उघडला, तेव्हा त्यात सीलबंद टिनचे डबे आढळले. या डब्यांमध्ये वरच्या बाजूला मिठासारखी पांढरी पावडर भरलेली होती. मात्र, जेव्हा ही पावडर बाजूला केली, तेव्हा आत व्हॅक्युम सीलबंद प्लास्टिक पॅकमध्ये 'हायड्रोपोनिक गांजा' लपवलेला उघड झाला. संपूर्ण मालाची तपासणी केली असता, एकूण ७६.५८ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
पुणे कस्टम्सने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून, हा माल पुण्यात कोणाला मिळणार होता आणि या आंतरराष्ट्रीय रॅकेटचे धागेदोरे कोठपर्यंत पसरले आहेत, याचा शोध घेतला जात आहे.
