वादाचे नेमके कारण काय? : मिळालेल्या माहितीनुसार, ३३ वर्षीय फिर्यादी तरुणाच्या शेतात कंपाउंड घालण्याचे काम सुरू होते. बुधवारी (२१ जानेवारी) संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास आरोपी त्या ठिकाणी चारचाकी गाडीतून आला. "कोणाला विचारून कंपाउंड करत आहेस?" असा सवाल करत त्याने फिर्यादीशी वाद उकरून काढला.
फिर्यादी तरुण जेव्हा भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करत होता, तेव्हा आरोपीने त्याला जोरात धक्का दिला. इतक्यावरच न थांबता आरोपीने लाकडी काठीने फिर्यादीच्या जबड्यावर जोरदार प्रहार केला. त्यानंतर "थांब तुला ठारच मारतो," अशी धमकी देत आरोपीने या तरुणाला शेजारीच असलेल्या विहिरीत ढकलून दिले.
advertisement
विहिरीत पडल्यानंतर तरुणाने आरडाओरडा केला. जवळच असलेल्या नातेवाईकांनी प्रसंगावधान राखून तातडीने विहिरीकडे धाव घेतली आणि तरुणाला सुखरूप बाहेर काढले. या भीषण हल्ल्यातून तरुण थोडक्यात बचावला असून, त्याच्या जबड्याला गंभीर दुखापत झाली आहे.
चाकण पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून, आरोपीविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चाकण दक्षिण पोलीस करत आहेत.
