नेमकी घटना काय?
कोथरूड परिसरात राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाने सोशल मीडियावर 'इलेक्ट्रिक बर्नर'ची आकर्षक जाहिरात पाहिली होती. सध्याच्या गॅस टंचाईच्या काळात ही शेगडी उपयुक्त ठरेल, या विचाराने त्यांनी जाहिरातीमधील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. सायबर चोरट्यांनी अतिशय चलाखीने त्यांना विश्वासात घेतले आणि शेगडीचे पैसे ऑनलाइन जमा करावे लागतील, असे सांगितले.
कशी झाली फसवणूक?
advertisement
पैसे भरण्याच्या प्रक्रियेत चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाकडून त्यांच्या बँक खात्याची गोपनीय माहिती मिळवली. या माहितीचा गैरवापर करून चोरट्यांनी काही वेळातच त्यांच्या खात्यातून तब्बल ३ लाख १० हजार रुपये दुसऱ्या एका अनोळखी खात्यात वळवले. खात्यातून मोठी रक्कम वजा झाल्याचा मेसेज आल्यानंतर आपल्याला गंडा घातल्याचे त्यांच्या लक्षात आले.
पोलिसांची कारवाई आणि सतर्कतेचा इशारा
याप्रकरणी पीडित ज्येष्ठ नागरिकाने कोथरूड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी अज्ञात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
सोशल मीडियावरील कोणत्याही अनोळखी जाहिरातींवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. ऑनलाइन खरेदी करताना केवळ अधिकृत आणि नामांकित वेबसाईटचाच वापर करा. तसंच कोणाशीही बँक खात्याचा तपशील, पिन किंवा ओटीपी शेअर करू नका.
