मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी नीलेश घायवळच्या घरात अॅम्युनिशन बॉक्स सापडला आहे. हा बॉक्स सामान्यत: भारतीय लष्कराकडून वापरला जातो. हा बॉक्स घायवळच्या घरात नक्की कुठून आला? यावरून आता विविध संशंय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी हा बॉक्स जप्त केला आहे. हा बॉक्स पुण्याच्या खडकीतील दारूगोळा कारखान्याशी (Ammunition Factory) संबंधित असल्याचा पोलिसांना संशय आहे. या गंभीर प्रकरणी नीलेश घायवळ याच्याविरुद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
घायवळच्या घरात काय सापडलं ?
पोलिसांनी घायवळच्या कोथरूडमधील घराची झडती घेतली असता, पोलिसांना घायवळच्या घरात दोन जिवंत काडतुसे, चार रिकाम्या पुंगळ्या आणि काडतुसे ठेवण्यासाठी वापरण्यात येणारा एक लाकडी बॉक्स (Amunition Box) आढळला आहे. या बॉक्सवर '२०१७' वर्ष आणि '५.५६ एमएम' असा उल्लेख आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या खोक्यामध्ये एका वेळी सुमारे ३०० काडतुसे ठेवण्याची क्षमता असते.
खडकी कनेक्शनचा तपास
सर्वात गंभीर बाब म्हणजे, हा अॅम्युनिशन बॉक्स खडकी येथील लष्कराच्या दारूगोळा कारखान्यातील (Defence Ammunition Factory, Khadki) असल्याची पोलिसांना शंका आहे. सरकारी मालकीचा हा दारूगोळ्याचा बॉक्स घायवळसारख्या गुंडापर्यंत कसा पोहोचला? या दृष्टीने पोलिसांनी अत्यंत गांभीर्याने तपास सुरू केला आहे. या 'खडकी कनेक्शन'ची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी दारूगोळा कारखान्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला आहे.
घायवळ युरोपमध्ये पसार, प्रत्यार्पणाची तयारी
नीलेश घायवळ सध्या परदेशात असून तो युरोपमध्ये पळून गेल्याची माहिती आहे. त्याला पकडून भारतात आणण्यासाठी पुणे पोलिसांनी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संस्थेशी (इंटरपोल) संपर्क साधला आहे. घायवळला अटक करण्यासाठी त्याच्याविरुद्ध 'ब्ल्यू कॉर्नर' (Blue Corner) नोटीस बजावण्यात आली आहे. घायवळच्या प्रत्यार्पणासाठी पोलीस तयारी करत असतानाच, दारूगोळ्याच्या खोक्यामुळे त्याच्यावरील गुन्ह्यांची तीव्रता वाढली आहे.