शेवगाव, जालना (अंबड), करमाळा (संगोबा), तसेच धाराशिव जिल्ह्यातील परांडा, कळंब आणि जामखेड या राज्य मार्गांवर मंगळवारी सकाळपासूनच बस सेवा अडखळली. अनेक बस थांबवाव्या लागल्या तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले. या परिस्थितीचा थेट परिणाम पुणे विभागातील प्रवाशांवर झाला. स्वारगेट आणि शिवाजीनगर स्थानकांवर पोहोचणाऱ्या गाड्या तासन्तास उशिराने आल्या. जालना मार्गावरील एसटी सेवा तर पूर्णपणे बंद ठेवावी लागली. यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागला.
advertisement
स्वारगेट स्थानकातून नियोजितप्रमाणे वल्लभनगर-परांडा, स्वारगेट-करमाळा, वल्लभनगर-भूम, स्वारगेट-परांडा या बस रवाना झाल्या. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा परिसरातून धाराशिवला जोडणाऱ्या मार्गावर सीनाई नदीला आलेल्या पुरामुळे बसेसचे मार्ग वळवावे लागले. त्यामुळे गंतव्यस्थळी पोहोचण्यात मोठा विलंब झाला. भूम, परांडा, सोलापूर, जामखेड, टेंभुर्णी आणि बार्शी येथून पुण्याच्या दिशेने निघालेल्या गाड्यांनाही तोच अनुभव आला. अनेक प्रवास रद्द करण्यात आले तर काही बस स्थानिक आगारातूनच परतवाव्या लागल्या.
या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित विभागांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. पावसाचा अंदाज आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन आगारप्रमुखांनी फेऱ्यांचे नियोजन करावे, असे आदेश त्यांनी दिले आहेत. पूरस्थिती किंवा पाण्याचे साचलेले भाग असलेल्या महामार्गांवरून बस धाववू नयेत आणि प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान पुणे विभागाचे विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी माहिती दिली की, मराठवाड्याकडे जाणाऱ्या बस सेवा काही प्रमाणात वेळेत पोहोचल्या. मात्र, परतताना मोठ्या अडचणी आल्या. अनेक गाड्या विलंबाने पोहोचल्या असून काही फेऱ्या रद्द केल्या आहेत. प्रवाशांना दिलासा देण्यासाठी तात्पुरते पर्यायी मार्ग आखले जात आहेत. हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन पुढील काही दिवस वाहतुकीवर निर्बंध राहण्याची शक्यता आहे.