सायंकाळनंतर रात्र गडद होत गेली तसतशी मध्यवस्ती आणि उपनगरांत गर्दी वाढली. हडपसर, कात्रज-धनकवडी, कोथरूड, वडगावशेरीसह विविध भागांत नागरिकांचा ओघ वाढत गेला. ऐतिहासिक, सामाजिक, पौराणिक आणि काल्पनिक देखावे पाहण्यासाठी मंडळांसमोर रांगा लागल्या. हत्ती गणपती, राजाराम मित्र मंडळ, नवजवान मित्र मंडळ, शनिवार सार्वजनिक गणेश मंडळ, निंबाळकर तालिम, माती गणपती, भरत मित्र मंडळ आदींच्या देखाव्यांना विशेष प्रतिसाद मिळाला.
advertisement
रात्रौ बारा वाजेपर्यंत देखावे खुले असल्याने आणि रविवारी गौराई आगमनामुळे नागरिकांनी उत्साहात सहभाग नोंदवला. तरुणाईने ऐतिहासिक देखावे पाहताना शिट्ट्या, ओरडून प्रतिसाद दिला तर कुटुंबियांनी पौराणिक, धार्मिक देखाव्यांना पसंती दर्शवली. विद्युत रोषणाईमुळे वातावरण अधिक रंगतदार झाले.
वाहतुकीतही प्रचंड गर्दी दिसली. उपनगर आणि पिंपरी-चिंचवड भागातून येणाऱ्या पीएमपी बस फुल्ल भरलेल्या होत्या. संध्याकाळी मेट्रो प्रवाशांची संख्याही लक्षणीय वाढली. स्वारगेट–जिल्हा न्यायालय या मार्गावर दर तीन मिनिटांनी मेट्रो चालविण्यात आली असून सेवा सकाळी 6 ते रात्री 2 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आली आहे.
गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. रस्त्यांवर बॅरिकेड्स, बॅच टॉवर, सीसीटीव्ही आणि ध्वनिक्षेपक यंत्रणा बसविण्यात आली. मध्यवर्ती भागात वाहनांची चळवळ थांबवून पादचारी व्यवस्थेला प्राधान्य देण्यात आले. स्थानिक पोलिसांना तत्काळ निर्णय घेण्याचे अधिकार दिले गेले. मंडळांच्या कार्यकर्त्यांनीही नियोजनात सहकार्य केले.
