गुप्त माहिती अन् वन विभागाचा सापळा
वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांना मंचर परिसरात खवल्या मांजर आणि सांबराच्या शिंगांची तस्करी होणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे वन विभागाने मोरडे फूड्स कंपनीच्या मागील बाजूस असलेल्या झटका खानावळीजवळ पाळत ठेवली. तिथे एम.एच. ०४, डी. वाय. ५६७ या क्रमांकाची निळी स्विफ्ट डिझायर कार उभी असल्याचे दिसले. संशय बळावल्याने पथकाने अचानक गाडीवर धाड टाकली.
advertisement
गाडीत आढळला धक्कादायक साठा
गाडीमध्ये उदय शंकर सुर्वे आणि नईम करीम खान (दोघेही रा. श्रीवर्धन, जि. रायगड) हे दोघे बसले होते. वन विभागाने त्यांची चौकशी करून गाडीची झडती घेतली असता, त्यांच्याकडे सुमारे ३ किलो खवल्या मांजराचे खवले, ३ नखे आणि सांबराची ४ शिंगे आढळून आली. हा सर्व मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली कार वन विभागाने जप्त केली असून दोघांनाही जागीच अटक करण्यात आली आहे.
तस्करीचे धागेदोरे रायगडपर्यंत
अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनचे रहिवासी आहेत. हे अवयव त्यांनी कुठून आणले आणि ते कोणाला विकणार होते, याचा तपास आता वन विभाग करत आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या कारवाईमुळे तस्करी करणाऱ्या टोळीचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
