पुणे - पुणे जिल्ह्यातील मुळशी, मावळ तालुका वेगवेगळ्या कारणांनी नेहमीच चर्चेत असतात. मात्र, या तालुक्यातील नागरिकांमध्ये सध्या एका गोष्टीमुळे दहशत पसरली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याठिकाणी रात्री 10 वाजेच्या सुमारास आकाशात ड्रोन आढळून येतात आणि नंतर गायब होतात. यामुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे.
पोलिसांना याबाबत नागरिकांनी सूचना दिल्यावर पोलीस गावागावात गस्त घालत आहेत. परंतु ड्रोनचा शोध लागत नसल्याने हे रात्री उडणारे ड्रोन नागरिकांची आणि पोलिसांची डोकेदुखी वाढवत आहेत. पुण्याच्या मावळ आणि मुळशी तालुक्यातील काही गावात हे रात्रीच्या वेळी ड्रोन फिरत आहेत. गावातील वस्त्यांचे छायाचित्र टिपले जात असल्याचे गावकऱ्यांनी माध्यमाशी बोलतांना म्हटले. या सर्व परिस्थितीत गावाच्या सुरक्षेसाठी पोलीस, ग्राम सुरक्षा दलाचे कार्यकर्ते रात्रभर गस्त घालत असल्याचेही सांगण्यात येत आहे. याविषयी बोलताना पौंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरिगोसावी यांनी माहिती दिली.
advertisement
खव्याच्या दरात 100 रुपयांची वाढ, असे आहेत सध्याचे दर, जालन्याच्या खवा बाजारातून ground report, VIDEO
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरिगोसावी यांनी म्हटले की, मावळ आणि मुळशी तालुक्यात सध्या चोरीचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांनी या भागात गस्त देखील वाढवली आहे. पोलिसांकडून आता अँटी ड्रोन गन लवकरच येणार असून गावकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. या भागात कुठलेही संशयी वाहन अथवा संशयी व्यक्ती आढळून आल्यास त्याला कुठलाही प्रकारची मारहाण न करता पोलिसांच्या स्वाधीन करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
गावातील तरुणांनी रात्रीची गस्त सुरु केल्याने आणि मोबाईल व्हॉट्स ग्रुपवरुन चोरीच्या संदर्भातील विविध अफवांची यात भर पडल्याने गावातील लोकांत मोठी दहशत पसरली असून हा ड्रोन पाहण्यासाठी गावागावात लोक जमत असून वेगवेगळे निष्कर्ष लावले जात आहेत. यावेळी गावाकऱ्यांनी शांत राहून पोलिसांना सहकार्य करावं अस आवाहन करण्यात येत आहे. तसेच समाज माध्यमांवरील अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असेही वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरिगोसावी म्हणाले.