Mahashivratri 2026 : महाशिवरात्री का साजरी केली जाते? महादेवांची पूजा कशी आणि कधी करावी? Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची मनोभावे आराधना केल्यास महादेवाची कृपादृष्टी लाभते आणि मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
पुणे : शिवभक्तांसाठी अतिशय महत्त्वाचा असणारा दिवस म्हणजे महाशिवरात्री. येत्या 15 फेब्रुवारीला महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. या दिवशी शिवभक्त मोठ्या श्रद्धेने उपवास, रुद्राभिषेक, पूजा आणि रात्रभर जागरण करतात. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची मनोभावे आराधना केल्यास महादेवाची कृपादृष्टी लाभते आणि मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मात्र महाशिवरात्री का साजरी केली जाते, यामागची पौराणिक कथा अनेकांना माहीत नाही. या कथेविषयी जाणून घेणार आहोत.
महाशिवरात्री का साजरी केली जाते?
पौराणिक कथेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता. काही मान्यतांनुसार याच दिवशी भगवान शंकरांनी तांडव नृत्य केले होते. तसेच देव-दानवांनी केलेल्या समुद्रमंथनातून हालाहल विष बाहेर आले होते. सृष्टीचे रक्षण करण्यासाठी भगवान शंकरांनी हे विष प्राशन केले. या घटनेनंतर त्यांचा कंठ निळा झाल्याने भगवान शिवांना नीलकंठ असे म्हटले जाते. महाशिवरात्री हा भक्ती, संयम आणि आत्मशुद्धीचा दिवस मानला जातो. या दिवशी भगवान शंकरांची पूजा, उपवास आणि जागरणाला विशेष महत्त्व दिले जाते.
advertisement
महादेवांची पूजा कशी आणि कधी करावी?
महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची पूजा दिवसभर करता येते. मात्र धार्मिक परंपरेनुसार रात्रीचा काळ शिवपूजेसाठी अधिक महत्त्वाचा मानला जातो. विशेषतः मध्यरात्रीचा वेळ, म्हणजेच निशिता काळ, हा शिवपूजेसाठी शुभ समजला जातो. अनेक ठिकाणी संध्याकाळपासून पहाटेपर्यंत चार प्रहरांत शिवपूजा करण्याची परंपरा आहे. पूजा करण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान केले जातात. शिवलिंगावर पाणी किंवा दूध अर्पण करून बेलपत्र, फुले, धूप आणि दीप अर्पण केले जातात. ‘ॐ नमः शिवाय’ या मंत्राचा जप करून आरती केली जाते.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 12, 2026 7:03 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Mahashivratri 2026 : महाशिवरात्री का साजरी केली जाते? महादेवांची पूजा कशी आणि कधी करावी? Video








