गणेश मंडळासमोरच हा थरार घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. जुन्या भांडणाचा राग मनात धरून चार जणांनी मिळून एका तरुणावर प्राणघातक हल्ला केला. सचिन माने असं हल्ला झालेल्या तरुणाचं नाव आहे. या तरुणावर एकाने पाठलाग करून चार वेळा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण दैव बलवत्तर म्हणून की काय तरुणाने प्रत्येक वार चुकवण्याचा प्रयत्न केला.
advertisement
जखमी सचिनने जीवाच्या आंकाताने धावत हल्लेखोराच्या तावडीतून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र चवथाळलेल्या आरोपीने चार ते पाच वेळा गाठून सचिनवर हल्ला केला. या हल्ल्यात सचिन जखमी झाला. यावेळी घटनास्थळी अनेक लोक होते. मात्र कुणीही सचिनच्या मदतीला धावलं नाही. ऐन गणपती मंडळासमोर हा हल्ला झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर येथील गणेश मंडळाजवळ काही तरुण बसले होते. त्यावेळी जुन्या भांडणावरून वाद उफाळून आला आणि चार आरोपींनी सचिन मानेवर कोयत्याने वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. हल्लेखोरांनी सचिनला शिवीगाळ करत मारहाणही केली. याप्रकरणी चार आरोपींविरोधात बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. ऐन सणासुदीच्या दिवसात घडलेल्या या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.