पर्यटकांची मोठी संख्या आणि देहूरोड येथील धम्मभूमीचा वर्धापनदिन यामुळे या मार्गावर भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, सोमाटणे फाटा ते देहूरोडच्या सेंट्रल चौकापर्यंत सुमारे ५ ते ६ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. एक तासहून अधिक वेळ तर गाडी जागची हलत नव्हती अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
प्रवाशांचे प्रचंड हाल
advertisement
आज सकाळपासूनच मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांचा ओघ वाढला आहे. नाताळ साजरा करण्यासाठी लोणावळा, पुणे आणि महाबळेश्वरकडे निघालेल्या पर्यटकांना या कोंडीचा मोठा फटका बसला. सोमाटणे फाट्यापासून सुरू झालेली ही रांग देहूरोड ओलांडून पुढे गेल्याने वाहनचालकांना तासनतास एकाच जागी अडकून पडावे लागले. उन्हाचा चटका आणि संथ गतीने चालणारी वाहतूक यामुळे लहान मुले आणि वृद्धांचे प्रचंड हाल झाले.
धम्मभूमी वर्धापनदिनामुळे गर्दीत भर
आज देहूरोड येथील ऐतिहासिक धम्मभूमीचा वर्धापनदिन देखील आहे. या निमित्ताने अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने अनुयायी देहूरोड परिसरात दाखल होत आहेत. एका बाजूला पर्यटकांची खासगी वाहने आणि दुसरीकडे वर्धापनदिनासाठी येणारी वाहने, अशा दुहेरी दबावामुळे महामार्गावरील यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे.
प्रशासनावर ताण
वाहतूक सुरळीत करण्यासाठी देहूरोड पोलीस आणि वाहतूक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी प्रयत्न करत आहेत. मात्र, वाहनांची संख्या रस्त्याच्या क्षमतेपेक्षा कितीतरी पटीने जास्त असल्याने कोंडी फुटण्यास विलंब होत आहे. सेंट्रल चौक आणि देहूरोड बाजारपेठ परिसरात वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने अंतर्गत रस्तेही जॅम झाले आहेत.
वाहनचालकांसाठी सूचना: जुन्या महामार्गावरील ही स्थिती पाहता, प्रवाशांनी शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करावा किंवा परिस्थितीचा अंदाज घेऊनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
