मिळालेल्या माहितीनुसार, महाळुंगे एमआयडीसी पोलिसांना खालुंब्रे परिसरात काही लोक झाडांच्या आडोशाला बसून जुगार खेळत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब बोरकर आणि त्यांच्या पथकाने सकाळी पावणे अकराच्या सुमारास घटनास्थळी छापा टाकला. यावेळी संशयित आरोपी '५ स्टार' कार्डावर पैसे लावून जुगार खेळताना आढळून आले.
advertisement
दोघांना अटक, तिघे पसार
पोलिसांनी घटनास्थळावरून अजित बाकसुल्ला सुलेमानी (३०, रा. महाळुंगे, मूळ- उत्तर प्रदेश) आणि सागर बंटी मालवे (२०, रा. महाळुंगे, मूळ- मध्य प्रदेश) या दोघांना ताब्यात घेतले आहे. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच शिवदास रतन पवार, बाबा आणि शाहीन नावाचे तिघे संशयित पसार होण्यात यशस्वी झाले. पोलीस आता या फरार आरोपींचा शोध घेत आहेत.
मुद्देमाल जप्त
या कारवाईत पोलिसांनी ३,२५० रुपये रोख, जुगाराचे साहित्य आणि इतर वस्तू असा एकूण ५,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
