नेमकी घटना काय? फिर्यादी साबिर अली मनिहार (१८) हा तरुण बुधवारी (२१ जानेवारी) रात्री आपल्या काकांसाठी औषधे घेऊन घरी जात होता. चिंचवड येथील गोल्डन चौक परिसरात तीन आरोपींनी त्याला अडवले आणि दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. साबिरने पैसे देण्यास स्पष्ट नकार दिल्याने आरोपींचा राग अनावर झाला.
advertisement
आरोपी लक्ष्या कांबळे याने साबिरच्या कानशिलात लगावली, तर इतर साथीदारांनी त्याला मारहाण सुरू केली. इतक्यावरच न थांबता, आरोपींनी रस्त्यावरील सिमेंटचा गट्टू साबिरच्या पायावर जोरात मारून त्याला गंभीर जखमी केले. यावेळी साबिरच्या नातेवाईकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही बेदम मारहाण करण्यात आली.
याप्रकरणी साबिरने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी चेतन सूर्यकांत पात्रे (२१), करण दोढे (१८) आणि लक्ष्या कांबळे (१८) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापैकी करण दोढे याला पोलिसांनी तातडीने अटक केली असून, फरार असलेल्या इतर दोन आरोपींचा शोध घेतला जात आहे.
