मावळ: सर्वत्र नववर्षाचं धुमधडाक्यात स्वागत करण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. एक एक प्याला रिचवत नववर्षाचं स्वागत केलं जात आहे. कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस सगळीकडे बंदोबस्त लावून आले आहे. पण, असं असताना ही पुण्यातील बंगळुरू मुंबई महामार्गावर देहुरोड परिसरात दारूच्या नशेत तर्राट असलेल्या दोघांनी तरुणाची पाठलाग केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी या दोन्ही दारुड्यांना ताब्यात घेतलं आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुरू-मुंबई महामार्गावर देहूरोड इथं महिलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पिंपरी-चिंचवडच्या वाकड येथील खासगी बँकेतून देहूरोडच्या दिशेने दुचाकीवरून जात असलेल्या एका तरुणीचा मद्यधुंद अवस्थेतील दोन तरुणांनी पाठलाग करत छेड काढली.
महामार्गावर अंधाराचा फायदा घेत कधी जोरात हॉर्न वाजवणे, तर कधी अश्लील हावभाव करत ७ ते ८ किलोमीटरपर्यंत या तरुणांनी तरुणीला त्रास दिला. अखेर सहनशक्ती संपल्यानंतर तरुणीने नातेवाईकांना फोन करून माहिती दिली. काही वेळातच नातेवाईक घटनास्थळी पोहोचले.
त्यानंतर नागरिकांच्या मदतीने या दोघांना पकडून चांगलाच चोप देण्यात आला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच देहूरोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणांना जमावाच्या ताब्यातून घेतलं. पोलिसांच्या ताब्यात देण्यापूर्वी नागरिक आणि नातेवाईकांनी या दारुड्या तरुणांना चांगलाच चोप देऊन चांगलाच धडा शिकवला. रात्रीच्या वेळी या परिसरातून अनेक महिला कामाच्या निमित्ताने घरी जात असतात. महिलांच्या सुरक्षिततेसाठी महामार्गावरील रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
