पुणे porsche कार अपघात प्रकरण : अल्पवयीन आरोपीची पोलिसांना धक्कादायक माहिती
आरोपी दारु प्यायला होता
मद्य प्राशनचा व्हिडीओ समोर आला आहे. मात्र रक्ताच्या चाचणीत दारू प्यायला नसल्याचं समोर आल्याची चर्चा होत आहे. त्याबाबत पुणे पोलीस आयुक्तांनी अद्याप ब्लड रिपोर्ट आले नसल्याचं सांगितलं. तसंच कोणताही रिपोर्ट निगेटिव्ह आलेले नाहीत. दोन वेगवेगळ्या ठिकाणी ब्लड रिपोर्ट घेतले आहेत. त्यामुळे लोकांमध्ये कोणताही संभ्रम राहणार नाही. जे सत्य आहे ते समोर येईल. आतापर्यंत मिळालेल्या पुराव्यानुसार तरुणांनी मद्य प्राशन केल्याचं स्पष्ट दिसत आहे. त्यांनी ऑनलाइन पेमेंट केलंय. त्याचे बिलही दारुचे आहे. त्यावरूनही त्यांनी दारू प्यायल्याचं स्पष्ट आहे. ब्लड रिपोर्ट येईल तेव्हा सविस्तर स्पष्ट करूच असंही पोलीस आयुक्त म्हणाले.
advertisement
Pune Porsche Car Accident : लाडकी लेक बाबांना देणार होती सरप्राइज
आरोपीला सज्ञान मानून शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न
कोर्टाची बेल ऑर्डर सार्वजनिक आहे. त्यात आरोपी दारुचा व्यसनी असल्याचं सांगितलंय. त्यावर मला बोलणं योग्य वाटत नाही. हे स्पष्ट आहे की रविवारी दोन अर्ज केले. हा भयंकर गुन्हा आहे. यात ७ वर्षापेक्षा जास्त शिक्षा आहे. त्याचे वय १६ वर्षाच्या वर आहे. त्यामुळे कलम १५ अंतर्गत त्यांना सज्ञान मानून शिक्षा व्हायला हवी. कायद्यात अशी तरतूद आहे. यात दोघांचा मृत्यू झालाय. अरुंद रस्त्यावर वेगाने वाहन चालवत होते. मद्यप्राशन करून त्यांनी हे कृत्य केल्यानं त्यांना गुन्हा दाखल व्हायला हवं. जोपर्यंत अर्जावर निर्णय होत नाही तोपर्यंत रिमांड होमला पाठवावं अशी विनंती केली होती. मात्र कोर्टाने ती फेटाळली.
मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडून कठोर कारवाईचे आदेश
मुख्यमंत्री शिंदेंनी फोन केला होता. गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांनी फोन केला होता. पोलीस महासंचालकांनी फोन करून सूचना दिल्या आहेत. पोलिसांनी कडक भूमिका घ्यावी. पोलीस कारवाई करत नसल्याची प्रतिमा दूर व्हायला हवी. जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी. त्याच अनुषंगाने पहिल्या दिवसापासून पोलीस काम करत आहेत असंही पोलीस आय़ुक्तांनी स्पष्ट केलं.
आरोपींना पिझ्झा बर्गर दिला की नाही?
अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुण तरुणीच्या नातेवाईकांना येरवडा पोलिसांकडून वाईट वागणूक मिळाल्याचे आरोप झाले आहेत. तसंच आरोपींना पिझ्झा, बर्गर पोलिसांनी दिल्याचे आरोप अपघातातील पीडितांच्या नातेवाईकांनी केलेत. यावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं की, या अपघात प्रकरणी चौकशीसाठी अधिकारी नेमले आहेत. नातेवाईकांना वाईट वागणूक दिलेली नाही. यात कोणताही पोलीस अधिकारी, कर्मचारी आरोपीला मदत करत असल्याचं आढळून आलं किंवा नातेवाईकासोबत वाईट वागल्याचं आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.
