पूनम ठाकूर असं हत्या झालेल्या २० वर्षीय तरुणीचं नाव आहे. या निर्घृण हत्येमुळे उरुळी कांचन परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. रात्री उशिरा ही घटना घडल्यानंतर उरळी कांचन पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. यावेळी मयत तरुणीच्या नातेवाईकांनी घटनास्थळी मोठा आक्रोश केला.
मिळालेल्या माहितीनुसार, पूनम ठाकूर ही उरुळी कांचन येथील एका आयुर्वेदिक मेडिकलमध्ये नोकरी करत होती. बुधवारी (१५ ऑक्टोबरला) संध्याकाळी ती नेहमीप्रमाणे काम संपवून घराकडे परतत होती. मात्र, ती बराच वेळ झालं तरी घरी पोहचली नाही. यामुळे कुटुंबीयांची चिंता वाढली आणि त्यांनी तिचा शोध सुरू केला.
advertisement
'भावाला लवकर गेटवर पाठव...' आणि फोन बंद
पूनमने शेवटचा संपर्क आपल्या मावस भावाशी साधला होता. फोनवर बोलताना तिने भावाला "लवकर गेटवर पाठव" असे सांगितले होते. यानंतर तिचा फोन अचानक बंद झाला. त्यामुळे कुटुंबीयांना संशय आला आणि त्यांनी तातडीने तिला शोधायला सुरुवात केली.
कुटुंबीयांनी केलेल्या शोधादरम्यान, त्यांना सोसायटी गेटजवळ प्रयागधाम रोडवर पूनमचा मोबाईल फोन, पाण्याची बाटली, एक पुरुषाचा बूट आणि एक सँडल पडलेले दिसले. या वस्तू सापडल्यामुळे कुटुंबीयांना काहीतरी अनुचित घडल्याची भीती वाटू लागली. आणखी जवळच्या परिसरात शोध घेतला असता, रस्त्यालगत असलेल्या मुरूमाच्या ढिगाऱ्यामध्ये पूनमचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला. अज्ञात व्यक्तींनी दगडाने ठेचून तिची हत्या केल्याचे स्पष्ट झाले.
या घटनेची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या निर्घृण खुनामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पूनमची हत्या कोणी आणि कोणत्या कारणाने केली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. उरुळी कांचन पोलीस या घटनेचा कसून तपास करत असून, आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.