पूनम विनोद ठाकूर असं हत्या झालेल्या २० वर्षीय तरुणीचं नाव आहे. ती उरुळी कांचन परिसरातील कोरेगाव मूळ येथील गगन आकांक्षा सोसायटीत आपल्या कुटुंबासोबत राहत होती. ती उरुळी कांचन येथील एका मेडिकल स्टोअरमध्ये नोकरी करत होती. बुधवारी ती नेहमीप्रमाणे कामावर गेली होती. मात्र काम करून घरी येत असताना नराधमाने तिला रस्त्यात गाठून तिची हत्या केली.
advertisement
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, मयत पूनम नेहमीप्रमाणे बुधवारी कामावर गेली होती. काम झाल्यानंतर ती रात्री आठच्या सुमारास आपल्या घरी परत येत होती. दरम्यान, कोरेगाव मूळ-प्रयागधाम रस्त्यावर अज्ञात व्यक्तींनी तिचा रस्ता अडवला. हल्लेखोराने पूनमच्या तोंडावर आणि डोक्यावर दगडाने बेछूट प्रहार केले. या हल्ल्यात पूनम गंभीर जखमी होऊन जमिनीवर कोसळली आणि यातच तिचा मृत्यू झाला.
चोरी, सूड की वैयक्तिक वाद?
या प्रकरणी मृत तरुणीचा भाऊ मनीष विनोद ठाकूर (वय २३) याने उरुळी कांचन पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून पूनमची पर्स, चप्पल, पाण्याची बाटली आणि मोबाईल फोन अशा वस्तू ताब्यात घेतल्या आहेत. या वस्तूंच्या आधारे, हा हल्ला चोरीच्या उद्देशाने, सूड घेण्यासाठी की अन्य कोणत्या वैयक्तिक वादातून झाला? याचा तपास पोलीस करत आहेत.
घटनेची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलीस ठाण्याचं पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालं. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली करत मोबाईल लोकेशन ट्रॅक करायला सुरुवात केली आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या टीम्सना रवाना करण्यात आल्या आहेत.