नेमकी घटना काय?
दिल्लीहून पुण्याकडे झेपावलेल्या इंडिगोच्या फ्लाइट क्रमांक 6E 2608 मध्ये हा सर्व प्रकार घडला. विमान हवेत असतानाच टॉयलेटमध्ये एक संशयास्पद चिठ्ठी आढळली, ज्यावर विमान बॉम्बने उडवून देण्याचा उल्लेख होता. यामुळे विमानात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले. विमानतळ प्रशासनाला याची तातडीने कल्पना देण्यात आली आणि पुण्यात लँडिंग होताच सुरक्षा यंत्रणांनी विमानाचा ताबा घेतला.
advertisement
सुरक्षित लँडिंग आणि तपासणी: इंडिगोच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, विमानातून सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्सना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर विमानाला एका वेगळ्या भागात नेऊन बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून सखोल तपासणी करण्यात आली. सुदैवाने, तपासणीत कोणतीही स्फोटक वस्तू आढळली नाही, ज्यामुळे प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला.
धमक्यांचे सत्र सुरूच: गेल्या काही दिवसांत इंडिगोच्या विमानांना मिळणाऱ्या या बनावट धमक्यांचे सत्र वाढले आहे. याआधीही दिल्ली-बागडोगरा विमानाला अशीच धमकी मिळाल्याने त्याचे लखनऊमध्ये आपत्कालीन लँडिंग करावे लागले होते. या वारंवार मिळणाऱ्या धमक्यांमुळे विमान वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पुणे विमानतळ पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, चिठ्ठी कोणी ठेवली याचा शोध सीसीटीव्ही आणि प्रवाशांच्या यादीवरून घेतला जात आहे.
