मागील अनेक महिन्यांपासून या बिबट्याने पुणे विमानतळाच्या विस्तृत आणि संवेदनशील परिसरात आपली उपस्थिती दर्शवली होती. या बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न अनेक कारणांमुळे आव्हानात्मक होते. बिबट्या विमानतळ परिसरातील भूमिगत बोगदे, दाट झुडपे आणि जिथे मानवी हालचाल कमी असते अशा ठिकाणांचा वापर आत-बाहेर जाण्यासाठी करत होता. विमानतळाच्या सुरक्षा नियमांमुळे त्याला पकडण्यासाठी नियंत्रित परिस्थिती निर्माण करणे आवश्यक होते.
advertisement
या संपूर्ण कालावधीत, वन विभाग आणि त्यांच्या सहयोगी संस्थांनी बिबट्यावर सातत्याने बारीक लक्ष ठेवले होते. त्यांनी कॅमेरा ट्रॅप (camera trap), live निरीक्षण करणारे कॅमेरे आणि पिंजरे यांचा वापर करून त्याच्या हालचालींचा मागोवा घेतला. बिबट्याला पकडण्यासाठी आखलेल्या धोरणाचा एक भाग म्हणून, त्याच्या बाहेर पडण्याच्या सर्व संभाव्य जागा शोधून त्या सुरक्षित आणि मजबूत करण्यात आल्या. तसेच, बोगद्याच्या आतील भागातील त्याच्या हालचाली अधिक अचूकपणे समजून घेण्यासाठी अतिरिक्त live कॅमेरे बसवून कॅमेरा ट्रॅपचे पुनर्स्थापन करण्यात आले.
अखेरीस, ११ डिसेंबर रोजी सुमारे ३० सदस्यांच्या अत्यंत कुशल आणि प्रशिक्षित संयुक्त पथकाने बिबट्याला पकडण्याची निर्णायक मोहीम हाती घेतली. या पथकाने बिबट्याला काळजीपूर्वक अंदाजे ८० फूट लांबीच्या एका बोगद्यात नेलं. जिथे नियंत्रित परिस्थितीत त्याला बेशुद्ध करण्यात आलं. या यशस्वी मोहिमेमुळे विमानतळ परिसरातील सुरक्षा आणि वन्यजीव संरक्षण या दोन्ही दृष्टिकोनातून एक मोठी चिंता दूर झाली आहे. बिबट्याला आता पुढील तपासणी आणि त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल.
