पुणे: वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे अवघ्या महाराष्ट्र हादरून गेला होता. हुंडाबळीच्या प्रकारामुळे समाज मन ढवळून निघालं होतं. त्यानंतर आता पिंपरी- चिंचवडच्या वाकडमधूम एक मन सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. हुंड्यापायी पुन्हा एका वैष्णवीचा बळी गेला आहे. वाकडमध्ये ही घटना घडली आहे. राहत्या घरात दिव्या सूर्यवंशी हिचा गळफास घेतलेला मृतदेह आढळून आला आहे. मात्र दिव्याने आत्महत्या केली नसून तिच्या नवऱ्याने आणि सासरच्या मंडळीने तिचा खून केल्याचा आरोप माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे.
advertisement
समोर आलेल्या माहितीनुसार, मुळची धुळ्याची असणारी दिव्या खैरनार हिचा विवाह तीन वर्षापूर्वी पुण्यातील वाकड येथे राहणाऱ्या हर्षल सूर्यवंशीसोबत झाला. दिव्या ही उच्चशिक्षित असून तिचे वडील शेतकरी आहेत. विवाहानंतर दिव्या हर्षलसोबत वाकटमधील उच्चभ्रू सोसायटीत राहत होती. पती हर्षला हा वारंवार कोणत्या ना कोणत्या कारणाने तिला टॉर्चर करायचा. मात्र गेल्या काही महिन्यापासून त्याने दिव्याकडे माहेरहून वस्तू आणण्यासाठी छळ करत होता.
फर्निचर करण्यासाठी पैसे आण म्हणत केला छळ
हर्षलने दिव्याकडे अगोदर सोन्याची अंगठी मागितली त्यानंतर घरातील फर्निचर करण्यासाठी माहेरहून पैसे आण, असे म्हणत तिचा छळ सुरू केला. दिव्याने पैसे न आणल्याने हर्षलने मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केल्याचे दिव्याच्या कुटुंबाचे म्हणणे आहे. अखेर हा जाचातूनच तिचा जीव गेला आहे. नोकरी न करण्यावरून सासरच्यांनी अनेकदा दिव्याला टोमणे मारले. सहा महिन्यात तिला त्रास देण्यास सुरुवात केली. माझ्या मुलीली न्याय द्या अशी मागणी तिच्या घरच्यांनी केली आहे.
लग्नाला २० लाख रुपये खर्च
दिव्याच्या आई म्हणाली, माझी मुलगी कधीच टोकाचे पाऊल उचलणार नाही. माझ्या मुलीला मारलं असून सासरच्या लोकांनी तिचा जीव घेतला आहे. माझी मुलगी अनेकदा सांगायची सासरचे सतत तिला टोचून बोलतात, मात्र आम्ही तिला समजायचो थोडा त्रास सगळ्यांना सहन करावा लागतो, पण आम्ही चुकलो. लग्नाच्यावेळी सासरच्यांनी ४० तोळ्याची मागणी केली. लेक पुण्यात सुखात नांदेल म्हणून साखरपुड्याला पाच लाख आणि लग्नाला २० लाख रुपये खर्च केला. आम्हाला काही नको फक्त आमच्या मुलीला न्याय द्या.
या प्रकरणी आता दिव्याचा पती हर्षल शांताराम सूर्यवंशी आणि तिच्या सासरच्या मंडळी विरोधात दिव्याचे कुटुंबीय वाकड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी गेले आहेत. दिव्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या हर्षल आणि त्याच्या कुटुंबीयांना विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी मृतक दिव्याच्या नातेवाईकांनी केली आहे.