पहिले या कामाला 1 जानेवारी 2026 पासून सुरूवात होणार होती, पण आता त्या तारखेमध्ये बदल करण्यात आला आहे. 9 जानेवारी 2026 पासून मंदिराच्या विकास कामाला सुरूवात केली जाणार आहे. 9 जानेवारी 2026 पासून पुढील तीन महिने मंदिराचे काम हाती घेतले जाणार आहे. यामध्ये, मंदिराचे सभामंडप, पायऱ्या आणि परिसरातील विकास कामे केले जाणार आहेत. विकास काम केले जात असताना भाविकांची सुरक्षा लक्षात घेऊन मंदिर पुर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय पुणे जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
advertisement
अलीकडेच झालेल्या बैठकीत, जिल्हा प्रशासन, श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान संस्थानचे विश्वस्त, स्थानिक दुकानदार आणि गावकरी यांच्या उपस्थितीत झालेल्या संयुक्त बैठकीत सविस्तर चर्चा करून सर्वांच्या सहमतीने मंदिर तीन महिन्यांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिरामध्ये डागडुजी केल्या जाणार आहे, त्या काळात श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात सभामंडप आणि पायरी मार्ग बांधकामासाठी 9 जानेवारी 2026 पासून पुढील तीन महिन्यांच्या कालावधीसाठी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, भाविकांसाठी महाशिवरात्रीच्या दिवसांमध्ये, 12 फेब्रुवारी 2026 ते 18 फेब्रुवारी 2026 या दिवसांमध्ये मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले असणार आहे. दररोज मंदिर दर्शनासाठी बंद असले तरी भगवान श्री भीमाशंकर यांची नित्यनियमाने पूजा अर्चा, अभिषेक, धार्मिक विधी परंपरेनुसार आणि नियोजित वेळेत सुरू राहतील. या कालावधीत भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश अथवा प्रत्यक्ष दर्शन सेवा उपलब्ध राहणार नाही. बांधकाम यंत्रणा, अधिकृत अधिकारी- कर्मचारी तसेच भीमाशंकर ग्रामस्थ वगळता कोणालाही श्री क्षेत्र भीमाशंकर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.
2027 मध्ये त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा भरवला जाणार आहे. त्या अनुषंगाने, कुंभमेळ्याच्या काळात नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये येणाऱ्या लाखो भाविकांकडून श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्यापूर्वी आवश्यक पायाभूत सुविधा, सभा मंडप, सुरक्षित प्रवेश- निर्गमन व्यवस्था तसेच गर्दी नियंत्रणाची कामे वेळेत पूर्ण करणे हे प्रशासनाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.
