नेमकी घटना काय?
चैतू बोसाक (रा. दांडेकर पूल, पर्वती, मूळ रा. बिहार) असे दुर्घटनेत जखमी झालेल्या मजुराचे नाव आहे. दांडेकर पूल परिसरातील आंबिल ओढा येथे सध्या एसआरएच्या इमारतींचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सोमवारी (२२ डिसेंबर) दुपारी अडीचच्या सुमारास चैतू पंधराव्या मजल्यावर कामात व्यस्त असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला.
advertisement
ठेकेदारावर कारवाई:
या प्रकरणी चैतूचा भाऊ पवन राजेंद्र बोसाक (२४) याने पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पवनने दिलेल्या फिर्यादीनुसार, ठेकेदार राज धर्मेंद्र दास (२४, रा. दांडेकर पूल, मूळ रा. बिहार) याने उंचीवर काम करणाऱ्या मजुरांसाठी सेफ्टी बेल्ट, जाळी किंवा हेल्मेट यांसारख्या सुरक्षा साधनांची कोणतीही तरतूद केली नव्हती. या गंभीर निष्काळजीपणामुळेच चैतूचा जीव धोक्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पुणे शहरात सध्या अनेक ठिकाणी गगनचुंबी इमारतींची बांधकामे सुरू आहेत. मात्र, अनेकदा परराज्यातून आलेल्या मजुरांना सुरक्षेची कोणतीही साधने न देता उंचावर कामाला लावले जाते. पंधराव्या मजल्यावरून पडल्यामुळे चैतूची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून, त्याच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
पुण्यातील कामगार संघटनांनी या घटनेचा निषेध केला असून, बांधकाम साईट्सवर सुरक्षेचे ऑडिट करण्याची मागणी केली आहे. पर्वती पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
