या प्रकरणाची सुरुवात नवी पेठेतील एका भाड्याच्या घरापासून झाली. तक्रारदाराच्या भाडेकरूने ड्रेनेजच्या कामासाठी संदीप चव्हाण नावाच्या व्यक्तीला बोलावले होते. त्याने आपण महानगरपालिकेचा अधिकारी असल्याचे सांगून ६५ हजार रुपयांत स्वतंत्र ड्रेनेज लाईन टाकण्याचे आमिष दाखवले. मात्र, एकदा का हा अधिकारी जाळ्यात अडकला की आरोपींनी त्यांच्या भोवती खोट्या नाट्याचा विळखा घट्ट केला. कधी मशिन डिपॉझिटच्या नावाखाली, तर कधी महापालिका चलनाच्या बहाण्याने त्यांनी पैसे उकळण्यास सुरुवात केली.
advertisement
हद्द तर तेव्हा झाली जेव्हा आरोपींनी तक्रारदाराला धमकावण्यासाठी चक्क बँक अधिकारी, पोलीस आणि न्यायाधीशांचे बनावट अवतार धारण केले. अटकेची भीती दाखवून आणि भावनिक दबाव टाकून त्यांनी मुलाचे ऑपरेशन, मृत्यू आणि न्यायालयीन खर्चाची खोटी कारणे सांगितली. जून २०२५ पर्यंत चाललेल्या या थरारामध्ये तक्रारदाराने आपली आयुष्यभराची पुंजी गमावली. पैसे परत मिळतील या आशेवर आणि कायदेशीर कारवाईच्या भीतीपोटी हे निवृत्त अधिकारी आरोपींनी सांगितल्यानुसार कोट्यवधी रुपये ट्रान्सफर करत राहिले. पुण्याच्या इतिहासातील ही एक मोठी आणि डोळे उघडणारी फसवणूक ठरली असून, सध्या पोलीस या टोळीचा कसून शोध घेत आहेत.
