संबंधित महिलेला गेल्या दोन महिन्यांपासून मासिक पाळीत अतिरक्तस्रावाचा त्रास होत होता. यामुळे तिचे हिमोग्लोबिन अवघे ५ ग्रॅम प्रति डेसिलिटरपर्यंत खाली आले होते. तपासणीत तिच्या गर्भाशयात एक अवाढव्य गाठ असल्याचे निदान झाले. महिलेला आधीपासूनच हृदयविकाराचा त्रास असल्याने ही शस्त्रक्रिया डॉक्टरांसाठी मोठे आव्हान होते.
अशी पार पडली शस्त्रक्रिया: कर्करोगतज्ज्ञ डॉ. निखिल पर्वते आणि हृदयविकारतज्ज्ञ डॉ. राजेश बदानी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेपूर्वी महिलेच्या मूत्रनलिकेत स्टेंट बसवण्यात आला, जेणेकरून इतर अवयवांना इजा होणार नाही. गाठीचा आकार खूप मोठा असूनही डॉक्टरांनी पोटाची खुली शस्त्रक्रिया करून १८ किलोची गाठ बाहेर काढली. विशेष म्हणजे, संपूर्ण प्रक्रियेत केवळ १०० मिली रक्तस्राव झाला, त्यामुळे रुग्णाला बाहेरून रक्त देण्याची गरज भासली नाही.
advertisement
शस्त्रक्रियेनंतर अवघ्या पाचव्या दिवशी महिलेला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. दोन आठवड्यांच्या तपासणीनंतर तिची प्रकृती उत्तम असून तिला आता कोणत्याही औषधांची गरज भासत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. "लवकर निदान आणि अचूक नियोजनामुळेच आम्ही आजूबाजूच्या अवयवांना धक्का न लावता ही गाठ काढू शकलो," असे डॉ. पर्वते यांनी नमूद केले.
